Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनवभारताच्या उत्थानासाठी तरूणाईने सज्ज व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवभारताच्या उत्थानासाठी तरूणाईने सज्ज व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे | प्रतिनिधी Pune

”ज्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर एरवी तरुणाईचे गप्पांचे फड रंगलेले दिसतात, त्याच रस्त्यावर आज राष्ट्रभक्तीचा आणि तिरंग्याचा अथांग महापूर पाहायला मिळत आहे. हीच पुण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील तरुणाई आज नव्या ऊर्जेने ‘नवभारताच्या उत्थानासाठी सज्ज’ झाली आहे,” असा विश्वास व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकर युवा शक्तीला भावी भारताच्या उभारणीसाठी साद घातली.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा यात्रा गौरव समिती’च्या वतीने पुण्यनगरीत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या समारोपप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते.

वरुणराजाची साथ, ढगांची दाटी अन् देशभक्तीचा स्फुल्लिंग
या ऐतिहासिक तिरंगा यात्रेची सुरुवात ललित महल चौकातून झाली, तेव्हा पाऊस कोसळत होता. मात्र, पावसाच्या सरींना न घाबरता हातांत मानाने तिरंगा बाळगून शेकडो महाविद्यालयीन तरुण-तरुणी रस्त्यावर ठाण मांडून उभे राहिले. काही वेळातच जोराच्या पावसाचे रुपांतर रिमझिम सरित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः फर्ग्युसन कॉलेजजवळ या रॅलीत थेट सहभागी झाले आणि तरुणांच्या खांद्याला खांदा लावून पायी चालत समारोपस्थळापर्यंत आले. फडणवीस व्यासपीठावर पोहोचून त्यांचे भाषण सुरू होताच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली; मात्र आकाशात ढग दाटून आले होते. निसर्गाच्या या विलोभनीय पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला होता.

अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव: फडणवीसांचे संबोधन
उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, “१९४२ च्या ९ ऑगस्टला महात्मा गांधींनी ‘करो या मरो’ आणि ‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा दिला होता. त्या क्रांतीतून १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रभक्तीचा जागर करण्याचे आवाहन केले आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत; परंतु त्याच संविधानाने नागरिकांवर काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही सोपवल्या आहेत. हातात तिरंगा धरणाऱ्या प्रत्येक तरुणाला या कर्तव्यांची जाणीव असणे गरजेचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “येत्या २० वर्षांत ‘विकसित भारत’ घडवताना ‘विकसित महाराष्ट्र’ निर्माण करण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा नवीन महाराष्ट्र समतेचा, प्रगतीचा आणि युवांच्या स्वप्नांना बळ देणारा असेल. आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, तर शस्त्रस्त्रांची निर्यात करणारा मजबूत देश झाला आहे. हा भव्य महाराष्ट्र घडवण्याची ताकद आणि भरवसा केवळ तुमच्यासारख्या तरुण पिढीवरच आहे.”

पुण्याची ऐतिहासिक क्रांतीभूमी आणि हुतात्म्यांचे स्मरण
पुण्याच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देताना फडणवीस म्हणाले, “ही पुण्यनगरी आई जिजाऊंची, छत्रपती शिवरायांची, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे ठणकावणाऱ्या लोकमान्य टिळकांची, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांची पावन भूमी आहे. ही केवळ विद्यानगरी नसून महाराष्ट्राचे इनोव्हेशन, उद्योग आणि संस्कृतीचे मुख्य केंद्रस्थान आहे.”

तिरंग्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करताना ते म्हणाले, “फाशीच्या तख्तावर जाताना ‘वंदे मातरम’ म्हणणारे क्रांतिकारक असोत, कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवणारे २२ वर्षांचे कॅप्टन विक्रम बात्रा असोत किंवा कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम ओंबाळे असोत; त्यांच्या बलिदानामुळेच आज हा तिरंगा अभिमानाने फडकत आहे. ऑपरेशन सिंधूरमध्ये सीमेवर पाकिस्तानला पराभूत करणारे आपले शूर सैनिक असोत, जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत या तिरंग्याची शान कोणीही कमी करू शकत नाही.”

भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेर पेश करत तरुणांमध्ये नवचैतन्य फुंकले:
“बाज की असली उडान अभी बाकी है,
हमारे इरादों का इम्तहान अभी बाकी है;
अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमीन,
अभी पूरा आसमान बाकी है!”

नेते मंडळींची मांदियाळी
‘तिरंगा यात्रा गौरव समिती’च्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, पुण्यातील भाजपचे सर्व आमदार, बहुसंख्य नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अभूतपूर्व उपस्थितीमुळे या तिरंगा यात्रेला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली होती.

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? बडा नेत्याच्या ‘टाटा बाय-बाय’ पोस्टने राजकीय चर्चेला...

0
दिल्ली | Delhi उत्तर प्रदेशच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे माजी...