पुणे | Pune
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून आता हायकोर्ट आणि आंदोलकांची भूमिका समोरासमोर आल्याचे चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासाकडे वळावे, तसेच सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही. “आम्ही इथून हलणार नाही,” अशी भूमिका घेत त्यांनी सरकारलाही थेट आव्हान दिले आहे.
आमचे आंदोलन सुरु होऊन सात दिवस झाले. आता महाज्योतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आंदोलन करणारे एमपीएससी विद्यार्थी गरीब आहेत म्हणून त्यांची चेष्टामस्करी करणार का? जोपर्यंत राज्य सरकार भीमनवारांना घरी पाठवत नाही तोपर्यंत विद्यार्थी ऐकणार नाहीत, असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.
‘आंदोलन सोडा, अभ्यासाला लागा!’ MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; सरकारला महत्त्वाचे निर्देश
फक्त ताशेरे ओढून काही होत नाही, कारवाई करा
न्यायालयाने विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलावे, सरकारशी प्रेमाने बोलू नये. फक्त ताशेरे ओढून काही होत नाही, कारवाई करा ही आमची मागणी आहे. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना घरी पाठवले पाहिजे. हायकोर्ट एमपीएससीच्या विषयात काय करु शकत नाही, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काहीतरी करु शकते. ही संवैधानिक प्रक्रिया आहे. विवेक भीमनवार यांना हटवण्यासाठी कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करुन तो प्रस्ताव राज्यपालांना पाठवला पाहिजे. याशिवाय, दुसरा कोणताही मार्ग नाही. आम्ही कोर्टावर विश्वास ठेवतो, पण एमपीसएसीचा अध्यक्ष फडणवीसांचा मित्र आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
अतुल सावेंचाही राजीनामा घ्यावा
महाज्योती परीक्षेदरम्यान पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील एका केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी केंद्रावर पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. दोन तासांच्या गोंधळानंतर महाज्योती परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. या अचानक रद्द झालेल्या परीक्षामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावर रोहित पवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत आहे. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यासोबतच मंत्री अतुल सावे यांचादेखील राजीनामा घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.” असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी, न्यायालयाने निरीक्षणे नोंदवली. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असून परीक्षा व्यवस्थेत घोटाळे आणि गोंधळ सुरू राहिल्यास त्यांचा अभ्यास कसा होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करून MPSC अध्यक्षांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत MPSC अध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी म्हटले.




