नाशिक | Nashik
तुझी आई-मम्मी कुठे आहे? न्यायाधीशांनी मायेने विचारलेल्या या प्रश्नावर त्या आठ वर्षांच्या निष्पाप नजरेने उत्तर दिले ते देवाघरी गेलेत…कसं काय? काय झालं त्यांना? येक्या काकानं त्यांना मारलं… तो समोर बसलेला येक्या काका! न्यायालयाच्या दालनात त्या निष्पाप बालकाने आरोपीकडे दाखवलेले बोट अन् त्याचे ते बोबडे शब्द… कोर्टाचा थरकाप उडाला. नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या खेडभैरवच्या तिहेरी हत्याकांड (Triple Murder Case) खटल्यातील हा तो क्षण होता, ज्याने एका नराधमाच्या पापाचा घडा भरला आणि तीन निष्पाप जिवांना अखेर न्याय मिळाला.
३० जून २०१८ ची ती उजळलेली सकाळ. इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) खेडभैरव (माळवाडी) या शांत निसर्गरम्य गावात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे सुरू होती. ५५ वर्षांच्या हिराबाई शंकर चिमटे घराबाहेर बसल्या होत्या. अचानक त्यांचा २१ वर्षांचा पुतण्या सचिन उर्फ येक्या गणपत चिमटे हातात लाकडी दांडका आणि धारदार चाकू घेऊन समोर आला. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून सचिनच्या मनात राग धगधगत होता. आपल्याला कमी जमीन मिळाली आणि चुलती व तिची सून आपल्याकडे रागाने बघतात, असा भ्रामक संशय त्याच्या डोक्यात घोळत होता. रागाने लाल झालेल्या सचिनने विचार न करता लाकडी दांडक्याने थेट चुलती हिराबाईंच्या डोक्यात सपासप वार केले. आकांत ऐकून त्यांची सून मंगलबाई (३०) मदतीसाठी धावली. पण क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या सचिनने मंगलबाईच्या गळ्यावरच चाकू चालवला.
रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. त्याच वेळी आईच्या पाठीमागे धावत आलेला ६ वर्षांचा चिमुरडा रोहितही या नराधमाच्या तावडीत सापडला. नराधम सचिनने त्या निष्पाप रोहितच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि त्याला उचलून दगडावर आदळले. एकापाठोपाठ एक तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, सचिनचा राग शांत झाला नव्हता. तो चुलत्याच्या घराकडे चालला असता, मंगलबाईंचा दुसरा ३-४ वर्षांचा लहान मुलगा यश समोर आला. नराधमाने यशच्या शरीरावरही चाकूने वार केले. परंतु, दैव बलवत्तर होते म्हणून यश या जीवघेण्या हल्ल्यातून वाचला. उपस्थितांनी धाव घेऊन सचिनला आवरले अन् गंभीर जखमी यशला रुग्णालयात दाखल केले. हाच यश पुढे या तिहेरी हत्याकांडातील मोठा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला. घटनेची बातमी समजताच घोटी पोलिस ठाण्याचे (Ghoti Police Station) तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी पथकासह धाव घेतली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते तीन मृतदेह आणि अवघ्या काही वर्षांच्या बालकाचे ते अवशेष पाहून कोणताही खंबीर माणूस हादरून जावा असा तो रक्तपाच होता. आरोपी सचिनला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले. परंतु, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुराव्यांची साखळी जोडणे आवश्यक होते. भालेराव यांनी घटनास्थळावरून लाकडी दांडका, रक्तबंबाळ चाकू, कपडे आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. हवालदार शीतल गायकवाड, पारधी, दोंदे, मथुरे आणि कासार यांच्या सहकार्याने अवघ्या ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सन २०२२ मध्ये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.
न्या. एम. व्ही. भाटिया यांच्या दालनात प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून ८ वर्षांच्या यशला आणण्यात आले. आई, आजी आणि भावाला गमावलेल्या त्या चिमुरड्याची अवस्था पाहून न्यायाधीशांचेही हृदय पिळवटून निघाले. भाटिया यांनी यशला स्वतःजवळ बोलावले आणि प्रेमाने जवळ बसवून चौकशी केली. यशने भीती न बाळगता कोर्टात हजर असलेल्या सचिन उर्फ येक्या काकाकडे बोट दाखवले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडलेला युक्तिवाद आणि तपासी अधिकारी पंकज भालेराव यांनी न्यायालयात दिलेली साक्ष यामुळे गुन्ह्याची भीषणता स्पष्ट झाली. साक्ष देताना खुद्द पोलिस अधिकारी भालेराव यांच्या डोळ्यांतही अश्रू आले.
अखेर न्याय झाला
भरभक्कम फॉरेन्सिक पुरावे, पोलिस तपास आणि बालकाची ती थरकाप उडवणारी साक्ष याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सचिन गणपत चिमटे याला तिहेरी खुनाच्या गुन्ह्यात चार जन्मठेपेची शिक्षा आणि तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. जमिनीच्या एका तुकड्यासाठी पोटच्या नात्यांचा असा अमानुष बळी घेणाऱ्या सचिनच्या कृत्याने संपूर्ण नाशिक जिल्हा सुन्न झाला होता. परंतु, घोटी पोलिसांचा तपास आणि यशच्या धैर्यामुळे या क्रौर्याचा अंत न्यायाच्या विजयगाथेने झाला.




