नाशिक | प्रतिनिधी
घरासमोर दारू पिण्यास मनाई केल्याचा राग आल्याने त्रिकुटाने सहायक पोलीस उपनिरिक्षकास मारहाण करत चाकूने जखमी केल्याची घटना उपनगरच्या कॅनॉलरोड परिसरात घडल्याची बातमी पोलिसाच्या डेली क्राईम रिपोर्टमध्ये आली होती. मात्र, नजरचुकीने फिर्यादीच्या जागी ठाणे अंमलदाराचे नाव आल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली आहे.
अधिक माहिती अशी की, संशयित दत्ता हिरोडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी) व त्याचे दोन साथीदार (पुर्ण नाव नाही) हे बाबासाहेब बाबुराव गुडेकर यांच्या घरानजीक असलेल्या नगर पालिकेच्या जागेवर मद्य सेवन करत होते. यावेळी गुडेकर यांनी घरात लहान मुले असतात तरी तुम्ही इथून जा असे सांगितले. याचा राग अनावर झाल्याने हिरोडेसह त्याच्या दोन्ही साथीदारांनी गुडेकर यांना मारहाण करत जखमी केले.
गुडेकर यांच्या तक्रारीनंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या जागी सहायक पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांचे नाव अनवधानाने पोलीस विभागाकडून येणाऱ्या डेली क्राईम रिपोर्ट समाविष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसावर हल्ल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या.
सोशल मीडियात हल्ल्याची बातमी पसरू लागल्यानंतर या प्रकारची गंभीर दखल घेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहकले यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फिर्यादी गुडेकर नामक असून नजर चुकीचे पोलिसाचे नाव यामध्ये आले आहे.
त्यामुळे नाशिक शहरात कुठल्याही पोलिसावर हल्ला किंवा मारहाणीचा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. वरील घटनेचा तपास पोलीस अधिकारी परदेशी करत आहेत.




