मुंबई | Mumbai
नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक एनडीए सरकारने संसदेत आणले होते. मात्र विधेयक मंजूर करण्याकरता लागणारे दोन तृतीयांश मते एनडीए सरकारला जमावता आली नाही. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झाले. विधेयक पडल्यानंतर आता राज्यात महायुतीच्या वतीने आता विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरत रान पेटवणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या मुद्यावरून विरोधकांवर मोठी टीका केली आहे.
युवा शक्ती जागर यात्रा काढत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत. ज्यांनी काम केले आहे, ज्या उत्तम संस्था व विविध घटक आहेत. अशा सगळ्या घटकांपर्यंत ही यात्रा नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. युवा शक्तीला जागृत करून राष्ट्रीय विचाराने प्रेरित करायचे काम हे जागर यात्रेतून होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांच्या आतील आहे. ही युवा शक्ती संघटित करून एका दिशेने नेऊ शकलो तर एक परिवर्तन महाराष्ट्रात करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधक सीरिअल लायर आहेत
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताच्या संसदेत महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे. कारण विरोधक सीरिअल लायर आहेत. ते रोज खोटे बोलतात. 2023 ला विधेयक आले आणि ते पारित झाले. ते विधेयक कधी लागू केले पाहिजे, त्याचे संविधान संशोधन आले होते. 2023 मध्ये विधेयकाला तोंड दाबून पाठिंबा दिला होता. पण त्यांच्या आता लक्षात आले की, एनडीएकडे दोन तृतीयांशी संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे खरे दात दाखवले. असे करून विरोधी पक्षांनी संपूर्ण भारतातील नारी शक्तीचा आणि लोकशाहीचा अपमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे याचा जागर गरजेचा आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
तुमच्या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू आहे
या बिलाला विरोध करून नारी शक्ती व लोकशाहीचा अपमान विरोधी पक्षांनी केला आहे. रोज खोटे बोलतात. डिलिमेटशन, सेन्सस बाबत खोटे बोलतात. संविधानाने टाकलेली जबाबदारी काय, हे अमित शाह यांनी स्पष्ट केले. एक तासात विरोधकांनी सुचवलेले सुधारणा करायची तयारी दाखवली होती. पण त्यांना महिला आरक्षण लागू करायचे नाही. तुमच्या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू आहे. जोपर्यंत ३३ टक्के महिला संसदेत पोहोचणार नाही. सीरियल लायर्सला मी सांगतो. कितीही खोटे बोललो, तरी झूठ की उमर बडी नही होती, सच कभी समाप्त नही होता, सत्य कधी संपणार नाही, हेच मी सांगू इच्छितो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.




