श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षिय, विविध व्यापारी संघटना व नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदला तिसर्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी संपूर्ण शहरातील व्यापार-व्यवसाय, बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार ठप्प राहिले. या बंदचा फटका आता शिक्षण क्षेत्रालाही बसू लागला असून शहरातील बहुतांश शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्था, खासगी तसेच काही अनुदानित शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून अध्यापन बंद ठेवले आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांवर नेहमी दिसणारी विद्यार्थ्यांची लगबग पूर्णपणे गायब झाली असून परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट नसल्याने वातावरणही ओस पडल्याचे दिसून येत आहे.
अध्यापन बंद राहिल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शाळा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. विशेषतः परीक्षा, घटक चाचण्या आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकांमध्येही याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील काळात अतिरिक्त तासिका किंवा विशेष नियोजन करण्याची गरज निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, शहरातील बंदमुळे व्यापारी व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला असून सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. नागरिकांनी हत्येचा निषेध व्यक्त करताना दोषींवर कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे. मात्र, या आंदोलनाचा परिणाम विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांवर होत असल्याची भावना देखील व्यक्त केली जात आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. दरम्यान, शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




