Wednesday, February 19, 2025
Homeनगर50 हजार लोक बिनधास्त घेणार मद्याचा आस्वाद

50 हजार लोक बिनधास्त घेणार मद्याचा आस्वाद

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन || एक दिवसाचा काढला परवाना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आज थर्टी फर्स्ट, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा ठिकाणी दारू पिण्यासाठी मद्यपींनी एक दिवसाचा परवाना काढला आहे. जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांना 50 हजार मद्य सेवन परवान्यांची विक्री करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मद्यपींना परवाने दिले जाणार आहे. दोन रुपयात देशी आणि पाच रुपयात विदेशी दारूचा परवाना घेऊन एक दिवस मनसोक्त मद्य प्राशनचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, या परवान्यामुळे मद्यपींना दारू विकत घेताना किंवा पिताना पोलिसांकडून पकडले जाण्याचा धोका राहिलेला नाही.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 31 डिसेंबर रोजी एक दिवसाचा मद्य सेवन परवाना दिला आहे. जिल्ह्यातील सहा विभागातील अधिकृत मद्य विके्रत्यांना सुमारे 50 हजार मद्य सेवन परवान्यांची विक्री केली आहे. त्यात देशी मद्यविक्रीसाठी दोन रुपये तर, विदेशी मद्यविक्रीसाठी पाच रुपये दर ठेवण्यात आहे. बिअरबार व देशी दारू दुकानामध्ये एक दिवसाचा मद्य परवाना मिळणार आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यपींसाठी दारूचे दुकाने एक वाजेपर्यंत आणि पब व बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. आज ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रिसार्ट, हॉटेलवरील पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांची नजर असणार आहे. परवाना काढून पार्ट्या होतात का?, पार्ट्यांत बनावट दारूची विक्री तर होत नाही ना यावर लक्ष असणार आहे.

जिल्ह्यात पोलीस दलाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खर्डा, केडगाव, प्रवरासंगम, बेलवंडी आदी आठ ठिकाणी नाका बंदी करण्यात आली. हॉटेल, लॉजिंगची तपासणीसाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहे. हॉटेल, रिसार्ट, ढाब्यावर ओल्या पार्ट्यांचे नियोजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त नेमला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या नगर, संगमनेर, सुपा येथे तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचा समांतर बंदोबस्त राहणार आहे. हॉटेल, ढाबे, लॉजिंग, विनापरवाना मद्य वाहतुकीवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच, दारू पिवून वाहन चालविणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहने चालविणार्‍यांवर नाकाबंदीदरम्यान कारवाई केली जाणार आहे.

परवान्याला अल्प प्रतिसाद
दारू पिणार्‍यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वर्षभर मद्यसेवन परवान्याची विक्री केली जाते. मात्र ते परवाने काढण्यास मद्यपींनी अल्प प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान, जिल्ह्यात अवघ्या 767 लोकांनी मद्य सेवनाचा परवाना घेतला आहे. यामुळे वर्षभर विना परवाना मद्य सेवनाकडेच मद्यपींचा कल असल्याचे दिसून येते.

आठ दिवसांपासून छापेमारी
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्री, वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून सुमारे 90 गुन्हे दाखल करून 91 जणांना आरोपी केले. तर, त्यांच्याकडून 38 हजार 990 लिटर दारू, दहा वाहनांसह 31 लाख 30 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या