Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यायावर्षीही रामजन्मोत्सव साधेपणाने; रथयात्राही रद्द

यावर्षीही रामजन्मोत्सव साधेपणाने; रथयात्राही रद्द

पंचवटी। वार्ताहर

करोनामुळे सालाबादप्रमाणे होणारा श्रीरामांचा जन्मोत्सव सलग दुसर्‍या वर्षी देखील बुधवार (दि.21) साध्या पध्दतीने केला जाणार आहे. शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिरात यंदाचे मानकरी बुवा व मोजक्या पुजार्‍यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव होणार आहे. याही वर्षी मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने, मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये असे आवाहन मंदिर विश्वस्त धनंजय पुजारी यांनी केले आहे.

- Advertisement -

दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने प्रसिद्ध काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. करोना पार्श्वभूमीवर मागील वर्षी पासून सलग दोन वर्ष हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. या कालावधीत होणारे सर्व धार्मिक पूजा अर्चा व महत्वाचे उत्सव मानकरी बुवा व मोजके पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत. यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्याहस्ते हे सर्व उत्सव साजरे केले जाणार आहेत.

बुधवारी (दि.21) होणारा रामजन्मोत्सव शासनाने लागू केलेल्या करोना नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. पहाटे साडेपाच वाजता धनंजय पुजारी यांच्याहस्ते काकड आरती होणार असून, उत्सवाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्याहस्ते सकाळी 7 वाजता महापूजेस प्रारंभ केला जाणार आहे. या महापूजेनंतर दुपारी बारा वाजता मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

सायंकाळी 7 वाजता अन्नकोट व महाआरती केली जाणार आहे. यानंतर रात्री 8 वाजता नरेश पुजारी यांच्या हस्ते शेजारती होणार आहे. देशासह राज्यात करोनाचे वाढते संक्रमण पाहता शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करीत हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. याही वर्षी भाविकांना मंदिर बंद करण्यात आले असल्याने, कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये. असे आवाहन मंदिर विश्वस्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रथयात्राही रद्द

दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव चैत्र नवमी या दिवशी साजरा केला जातो. यानंतर येणार्‍या एकादशीला शहरात श्रीराम रथ व गरुड रथ काढली जाते. या रथोत्सवाला देखील शेकडो वर्षांची परंपरा असून, कोरोनामुळे मागील वर्ष ही रथयात्रा रद्द करण्यात आली होती. ही रथयात्रा म्हणजे नाशिककरांसाठी जणू एक आनंदाची पर्वणीच असते. सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना नाशिककर करीत असल्याने, याही वर्षी ही रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. हा उत्सव देखील काळाराम मंदिरात मानकरी बुवा व मोजक्या पुजार्‍यांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या