अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सासू-सासरे, पतीला शिवीगाळ करत तरूणाने विवाहितेसोबत गैरवर्तन केले. तसेच संपूर्ण कुटुंब अॅसिड टाकून पेटवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी माळीवाडा भागात घडली. या प्रकरणी तरूणाविरूध्द शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
अक्षय संपत चेडे (रा. माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादीच्या पतीला अक्षय चेडे याने गणेश विसर्जन मिरवणुकीत काही एक कारण नसताना शिवीगाळ केली होती. फिर्यादीचे पती त्याला काही न बोलता निघून गेले. यानंतर अक्षय चेडे फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीसह त्यांचे सासू-सासरे मध्ये आले असता अक्षयने सासू-सासर्यांना ढकलून देत फिर्यादीशी गैरवर्तन केले. तसेच संपूर्ण कुटुंबाला अॅसिड टाकून पेटवून देण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.