ताहराबाद | वार्ताहर
बागलाण तालुक्यातील अंतापूर गावाजवळ एक भीषण तिहेरी अपघात झाला असून ताहाराबादकडून बोरदैवतकडे मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला आयसर गाडीने अचानक कट मारल्याने पिकअप आणि समोरून येणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ताहाराबादकडून सायंकाळी बोरदैवतकडे मजूर घेऊन जाणारी पिकअप अंतापूर गावाजवळून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने अचानक कट मारला. ज्यामुळे मजूरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाट कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये तानाजी सोनवणे (२४) हनुमंतपाडा, शंकर मोरे (३४) हनुमंतपाडा, आशा सोनवणे (१८) बोरदैवत यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोनू गौरव माळी (२५), सुनंदा गोरख माळी (२८), तानाजी सोमनाथ सोनवणे (३६) तिन्ही राहणार हनुमंतपाडा, ताईबाई व त्यांचे पती (पूर्ण नाव समजू शकले नाही) (२५), रोशन डोंगर शिंदे (१७), राशी फुल्या (१७), आशा उकळ्या सोनवणे (१४), रुपाली डोंगर शिंदे (१७) खुशी सखाराम सोनवणे (१३), सर्व राहणार बोरदैवत हे गंभीर जखमी झाले. ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोउपचार करून पुढील उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात जखमींना हलवण्यात आले. ताहाराबाद व अंतापूर गावातील युवकांनी युद्ध पातळीवर अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध करून दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




