उमराणे-देवळा | वार्ताहर Umrane
मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणे शिवारात भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता ओलांडत झाडावर जाऊन कार उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार झाले तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये चार वर्षीय बालकाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अंगाचा थरकाप उडवून देणारी ही घटना घडली. अपघातातील मृत व जखमी कुटूंबीय मुक्ताईनगर येथील सातोड येथे लग्नासाठी जात असल्याचे सांगण्यात आले.
या अपघाताचे अधिक वृत्त असे की, मुक्ताईनगरातील सातोड येथील संजय नाफडे परिवार नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक आहेत. आज सकाळी नाफडे कुटूंब सातोड येथे लग्नकार्यास उपस्थित राहण्यासाठी टाटा पंच कार क्र.एम.एच.-१५-जे.एम.-५१८२ मधून मुंबई-आग्रा महामार्गावरून मुक्ताईनगरकडे जात असतांना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही भरधाव कार उमराणेलगत शेतकी फार्मजवळ आली असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जावून थेट झाडावर जात आदळून उलटल्याने चारही टायर वरती आले होते. कार अती वेगात असल्याने झाडाला धडक बसताच एका बाजुचा अक्षरश: चुराडा झाला.
या भीषण अपघातात चालक दिपक किशोर नाफडे (३२), त्यांचा मुलगा प्रथमेश दिपक नाफडे (४), बहिण अंकिता किशोर नाफडे (सर्व रा. राजीवनगर, नाशिक) हे तिघे गंभीररित्या जखमी होवून जागीच ठार झाले. तर मृत दिपक या़चे काका संजय पांडुरंग नाफडे, काकू चारूलता संजय नाफडे, पत्नी पूजा दीपक नाफडे हे तीघे गंभीर जखमी झाले. हा भिषण अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांसह देवळा पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले च़िचवे येथील बाबाजी रूग्णवाहिका व उमराणे येथील जे.के. रुग्ण वाहिका चालक राहूल वाघ व गणेश पवार यांनी जखमींना तातडीने मालेगाव येथे उपचारासाठी हलविले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात घडताच महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत या अपघाताचा पंचनामा केला.या अपघाताची देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.




