Friday, May 3, 2024
Homeनंदुरबाररजाळे येथील खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

रजाळे येथील खून प्रकरणी तिघांना जन्मठेप

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

तालुक्यातील रजाळे (Rajale) येथे झालेल्या खून प्रकरणात (murder case) तिनही आरोपीतांना सत्र न्यायालयाने (Sessions Court) जन्मठेप (life imprisonment) व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ जुलै २०१८ रोजी तालुक्यातील रजाळे गावातील सुरेश सोनु कोळी (वय-४०) हे शेतातून काम आटोपून दुपारी १२.३० वाजता घरी आले. ३ ते ३.३० वाजता त्यांच्या मामाचा मुलगा गोपाल आनंदा कोळी याने घरी येवून तुमचा भाऊ अरुण सोनु कोळी यांना मंगलसिंग उर्फ नथा ठाणसिंग गिरासे (वय-४५), रजेसिंग उर्फ रावसाहेब ठाणसिंग गिरासे (वय-३६), प्रविण झूलालसिंग गिरासे (वय-२७) हे महाराणा प्रताप फलकाजवळ लाथा-बुक्कयांनी मारहाण करत असल्याचे सांगितले.

म्हणुन सुरेश कोळी व गोपाल कोळी हे अरुण यांना सोडविण्यास आले. त्यांना पाहून तिघे पळून गेले. त्यानंतर सुरेश कोळी हे त्यांच्या भावाजवळ गेले असता अरुणचा श्वास बंद झाला होता. तिघांनी किरकोळ भांडणावरुन अरुणच्या नाजुक भागावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवेठार मारल्याचे यातून निष्पन्न झाले. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांच्या कोर्टात झाली. मंगलसिंग उर्फ नथा ठाणसिंग गिरासे, रजेसिंग उर्फ रावसाहेब ठाणसिंग गिरासे, प्रविण झुलालसिंग गिरासे यांच्याविरुध्द सर्व कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिनही आरोपीतांना जन्मठेपेची व प्रत्येकी रुपये १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सदर खुनाच्या खटल्यात एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीतांविरुध्द सपोनि गणेश टी. पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड. विजय सी. चव्हाण यांनी पाहिले. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साबळे, पोना/गिरीष पाटील यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या