श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून अनेक अल्पवयीन मुले अडकत चालले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकावी, अशी मागणी सर्वपक्षीय व शहरातील व्यापार्यांनी केली आहे. गुन्हेगारीचा बिमोड होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक देण्यात आली असून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीरामपूरचे हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांचा भरदिवसा खून झाल्यानंतर सायंकाळी व्यापारी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय आणि शहरातील व्यापार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण गुलाटी, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, वैशाली चव्हाण, संजय फंड, प्रकाश चित्ते, अशोक थोरे, लकी सेठी, लखन भगत, दिलीप नागरे, संजय छल्लारे, राजाभाऊ कापसे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, जितेंद्र छाजेड, रवी पाटील, बाबा शिंदे, गौतम उपाध्ये, भीमा बागुल, अॅड. सुभाष जंगले आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर व्यापारी उपस्थित होते.
या प्रसंगी पोलिसांनी गुन्हेगारीचा बीमोड करावा, शहरात सीसीटीव्ही असूनही गुन्हेगारांवर धाक राहिला नाही,पोलिसावर कोणाचा तरी दबाव आहे, गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हेगारांना तडीपार केले पाहिजे, श्रीरामपूरचे भविष्य धोक्यात आले असून नागरिक असुरक्षित आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या चक्रात अडकत चालले आहेत. गुन्हेगारी मुळासकट उपटून काढा. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवा. हजारो कट्टे श्रीरामपुरात आहेत. सर्व प्रकारचे राजकीय जोडे बाजूला ठेवून आंदोलन झाले पाहिजे. प्रतीकात्मक आंदोलन करण्यापेक्षा गुन्हेगारी कायम स्वरुपी संपेपर्यंत आंदोलन सुरू ठेवले पाहिजे. श्रीरामपूरचा नशेचा बाजार बंद व्हावा,त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. भविष्यात निवडणूक लढवणेही अवघड होईल.
गुन्हेगारी टोळ्या चालवणार्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. माणुसकीची हत्या होत आहे, मास्टरमाईंड मुळासकट उखडून टाकले पाहिजे. जे चालले आहे त्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे, तो बंद झाला पाहिजे. एकजुटीने लढाई केली नाही तर श्रीरामपूर उध्वस्त होईल, अशा संतप्त भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या हल्ल्यातील मुख्य आरोपीसह सवर आरोपींना अटक होईपर्यंत श्रीरामपूर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेवून आरोपींचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.




