अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील व्यापारी सुदर्शन दिलीपचंद डुंगरवाल (वय 42 रा. मार्केटयार्ड, कोठी रस्ता, सिताबन लॉन्स जवळ) यांच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील तीन हेक्टर 43 आर क्षेत्रावर चार ते पाच अनोळखीने ताबा मारला. त्यांना विचारणा केली असता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी डुंगरवाल यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुंगरवाला यांचे बाबुर्डी घुमट शिवारात तीन हेक्टर 43 आर क्षेत्र आहे. त्याठिकाणी त्यांचे 500 चौरस फुटाच्या पोल्ट्री फॉर्मचे शेड आहे. ते सध्या बंद अवस्थेत आहे. दरम्यान, सदर ठिकाणी डुंगरवाला सोमवारी दुपारी एकच्या सुमारास गेले असता त्यांना चार ते पाच अनोळखी व्यक्ती तेथे राहत असल्याचे दिसले.
डुंगरवाला यांनी त्यांना विचारणा केली असता त्यातील एक जण त्यांना म्हणाला, ‘तु येथे थांबू नको, तु येथून निघून जा, तुझ्यावर आम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू’ असा दम दिला. आपल्या शेतात अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे डुंगरवाला यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून सदरचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी डुंगरवाला यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एन. पी. गांगुर्डे करत आहेत.