अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील व्यापार्याचा दुचाकीवरून पाठलाग करत ‘भाई का फोन आयेगा, उठा ले’, असे म्हणत, तसेच मोबाईलवर ‘चंद रुपयो के लिये तुम अपनी जान दाव पर नही लगाओगे’, असा मेसेज पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापारी किरण मोहनलाल राका (वय 56, रा. अलायम बंगला, आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राका यांचे जुना दाणे डबरा येथे दर्शन सेल्स नावाने बेकरी प्रॉडक्टच्या रॉ मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सहा कामगार आहेत. 14 डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता दुकान बंद करून सर्जेपुरा चौक, अप्पू हत्ती चौक मार्गे घरी जात असतांना अप्पू हत्ती चौकाजवळ त्यांच्या दुचाकीचा दोघांनी पाठलाग करून त्यांना आवाज देऊन रस्त्यात थांबवले. दुचाकीवरील एकाने भाई का फोन आयेगा उठालो, असे म्हणत दोघे तेथून निघून गेले. त्यांच्या हातात नळकांडी सारखे काहीतरी होते. त्यानंतर दुसर्या दिवशी 15 डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला.
त्यानंतर त्याच मोबाईल नंबरवरून फोन आला व त्यावर बोलणार इसम मेसेज पढा क्या, भाई का फोन आयेगा उठाव, असे म्हणाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना विचारले असता, तपास सुरू असून सीडीआर आल्यावर पुढील तपासाला दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.