राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय चव्हाण हे सकाळच्या वेळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईनवरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते. याच वेळी एका बाजूने गोवा एक्सप्रेस(१२७७९) ही रेल्वेगाडी येत असल्याने परिस्थितीचा अंदाज न आल्याने एका बाजूने येणाऱ्या रेल्वेगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातस्थळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती सरपंच विराज धसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल जयदीप बडे, चाँद पठाण, योगेश आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
राहुरी पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.




