Tuesday, June 16, 2026
Homeमहाराष्ट्रAccident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात; ९ महिला भाविकांचा मृत्यू

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात; ९ महिला भाविकांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिर दर्शनासाठी जात असलेल्या महिला भाविकांच्या पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ महिला जागीच ठार झाल्या असून २२ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर खेड परिसरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

ही दुर्दैवी घटना आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी घडली. पापळवाडी येथील महिला भाविक कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी पिकअप टेम्पोतून निघाल्या होत्या. पाईट ते कुंडेश्वर या मार्गावर असलेल्या एका नागमोडी वळणावर चढाव चढत असताना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण गमावल्यानंतर टेम्पो रस्त्याबाहेर जाऊन शेतात कोसळला आणि दोन-तीन पलट्या घेतल्या. अपघात इतका भीषण होता की अनेक महिलांचा मृत्यू जागीच झाला.

मृतांमध्ये शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई न्यानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे यांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून पाईट ग्रामीण रुग्णालयात आणि आसपासच्या खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी फुटलेल्या बांगड्या, चपला आणि रक्ताचे डाग पाहून हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले होते. आपल्या जवळच्या मैत्रिणींचे मृतदेह पाहून महिला भाविक अश्रूंनी कोसळल्या होत्या.

कुंडेश्वर मंदिर हे खेड तालुक्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. आजचा दिवस धार्मिक उत्साहाने सुरू झाला होता; मात्र या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...