Monday, September 28, 2026
Homeनगरहृदयद्रावक! बापलेकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ, कुठे घडली घटना?

हृदयद्रावक! बापलेकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ, कुठे घडली घटना?

शिरूर (तालुका प्रतिनिधी)

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीवरील मोटारीला लागलेल्या विजेच्या धक्क्याने बाप आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) हे सकाळी आपल्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचा १७ वर्षीय मुलगा भारत गाढवे वडिलांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. वडिलांना पाण्यात पडलेले पाहून त्याने तात्काळ मदतीसाठी मित्राला हाक दिली आणि त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भारताच्या मित्राने तात्काळ मदतीसाठी परिसरातील लोकांना बोलावले. ग्रामस्थांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करून बापलेकाला विहिरीतून बाहेर काढले आणि शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.

सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील सक्रिय सदस्य होते. ते दरवर्षी देहू ते पंढरपूर पायी वारीत सहभागी होत असत. त्यांना भजनांचे विशेष ज्ञान होते. त्यांचा मुलगा भारत हा टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात अकरावीचा विद्यार्थी होता. गाढवे कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील नांदूर पठार येथील असून, ते टाकळी हाजी येथे स्थायिक झाले होते आणि दुग्धव्यवसाय करत होते.

बापलेकाच्या अकाली निधनामुळे गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून, परिसरात गंभीर शांतता पसरली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...