अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
क्षयरोग निर्मूलन मोहीम अंतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांनी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि सर्व शासकीय अधिकार्यांनी ‘नि-क्षय मित्र’ म्हणून मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, आरोग्य विभागाने क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी मोहीम राबवावी, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवावे. खासगी रुग्णालयात क्षयरोग रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य उपचार होतील याबाबत लक्ष द्यावे.
सीईओ येरेकर यांनी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध संबंधित यंत्रणांचे सहकार्य घेण्याबाबत सूचना केल्या. आरोग्य केंद्रात क्षयरोगाबाबत नमुने घेण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. आहेर यांनी मोहिमेबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. मोहिमेअंतर्गत शाळा-महाविद्यालयातून क्षयरोगाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधींचाही सहभाग घेण्यात येईल. औद्योगिक संस्थांचे सहकार्य घेण्यासोबत चांगले काम करणार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर आणि शहरातील झोपडपट्टी भागात व्यापक जनजागृती करण्यात येईल. एनसीसी, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जनजागृती उपक्रमात युवकांना सहभागी करून घेण्यात येईल. सार्वजनिक ठिकाण, आश्रमशाळा, आयुष रुग्णालयात क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उपचार आणि आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
साडेआठ लाख नागरिकांची होणार तपासणी
ज्येष्ठ नागरिक, व्यसानाधिन व्यक्ती, कुपोषित नागरिक, झोपडपट्टी भागातील रहिवासी आदी साडेआठ लाख नागरिकांची मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात येणार असून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या ठिकाणी क्षयरोग तपासणीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नॅट यंत्र, एक्स रे सुविधा, फिरते एक्स रे वाहन, आवश्यक औषधे उपलब्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेल्या 5 वर्षात 13 हजार 965 रुग्ण उपचारांती बरे झाल्याची माहिती डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.