Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजघटसर्प विकाराने दोघा भावंडांचा मृत्यू

घटसर्प विकाराने दोघा भावंडांचा मृत्यू

आरोग्य यंत्रणा सतर्क

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

सायने बु. शिवारात चाळीसगावफाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या परप्रांती कुटुंबातील दोघा भावांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. या आजाराचे रुग्ण आढळल्याने महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

चाळीसगावफाटा परिसरात मोकळ्या जागी राजस्थान येथील मदारी कुटुंब उदरनिर्वाहानिमित्ताने वास्तव्यास आहे. या कुटुंबातील काबील सुनील मदारी (५) व सावंत सुनील मदारी (१) या दोघा सख्या भावांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवसापासून ताप व गळ्याला सुज, नाकातून रक्त येणे आदी त्रास होत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या दोघांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच काबील याचा मृत्यू झाला. याच लक्षणाने त्याचा भाऊ सावंत मदारी हाही गतप्राण झाला.

या प्रकाराने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. मदारी कुटुंब गेल्या दोन वर्षापासून आपल्या समाजबांधवांसह या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या वस्तीवर आरोग्य यंत्रणेने लसीकरण संरक्षण व आरोग्य जागृती सप्ताहात भेटी दिल्या होत्या. मात्र या कुटुंबांनी लसीकरण करून घेण्यास नकार दिला होता. कदाचित त्यामुळेच या बालकांत प्रतिकार क्षमता तयार झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सन २००४ मध्ये घटसर्प आजाराचे रुग्ण शहरात आढळून आले होते. यावेळी घटसर्पाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथील वाडिया रुग्णालयात उपचार करण्यातआले होते.

ताज्या बातम्या