Thursday, May 2, 2024
Homeशब्दगंधदो गज की दुरी...

दो गज की दुरी…

उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभ्यासक

सध्या चीनमधल्या शांघाय शहरामध्ये कोविड संसर्गाने हाहाकार माजवला आहे. इथून तयार प्रॉडक्टस्चा पुरवठा न झाल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियाच्या मार्केटमध्ये मरगळ आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग या वर्षाच्या अखेरीला तिसर्‍या निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत. अशावेळी या देशाची झिरो कोविड पॉलिसी योग्य होती की ‘दो गज दुरी, है जरुरी’ असे म्हणणारा भारत यशस्वी ठरला याचा विचार व्हायला हवा.

- Advertisement -

स ध्या चीन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर चिनी खेळणी येत नाहीत, स्वस्त बनावटीच्या चिनी वस्तू येत नाहीत तर डोळ्यासमोर येते वुहान आणि त्या वुहानमध्ये जन्माला आलेला कोविड हा विषाणू. पण आज संपूर्ण जगामध्ये करोना व्हायरसचा उद्रेक शांत होत असताना, किंबहुना तो अनेक देशांमधून हद्दपार होत असताना देशा-देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण प्रचंड वाढले असताना खुद्द चीनमध्ये मात्र परिस्थिती भीषण होत चालली आहे; विशेषतः शांघायमध्ये.

जग कोविडमधून बाहेर पडत असताना, मास्क फ्री असण्याचा आनंद उद्भवत असताना शांघायमध्ये मात्र कडक लॉकडाऊन आहे. खरे तर आता आतापर्यंत चायनाने हा विषाणू किती उत्तमरीत्या मॅनेज केला याचे वर्णन पाश्चात्य माध्यमे करत होती. कोविड आला त्यावेळी संपूर्ण जग कोविडची लढाई हरणार, भारताला ती लढता येणार नाही, इथली आरोग्य व्यवस्था खिळखिळी आहे, इथे लस नाही, मास्क नाही, पीपीई कीट नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सिजन नाही अशी जोरदार हाकाटी पाश्चात्य माध्यमांनी केली होती. पण आज काय परिस्थिती आहे? आज भारत दर महिन्याला निर्यातीचे उच्चांक गाठत आहे. जीएसटीचे कलेक्शन दर महिन्याला 1.5 बिलियन डॉलर्स इतके प्रचंड वाढतेय आणि शाघांय मात्र लॉकडाऊनमध्ये बंद आहे.

खरे तर चीनसाठी 2020-2021 काहीसे नॉर्मल गेले. पण जानेवारी 2022 मध्ये हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता त्याने संपूर्ण हाँगकाँगला गिळंकृत करून टाकल. आपल्याला माहिती आहे, ओमायक्रॉन हा अतिशय वेगाने पसरणारा, कमी घातक रोग असला तरी को-मॉर्बलिटीज म्हणजे डायबेटीस, ब्लड प्रेशर असे रोग असलेल्यांना त्याची निश्चित बाधा होते. त्यामुळे हाँगकाँगमध्ये हाहाकार माजला. मग तो शांघायमध्ये पसरला. ओमायक्रॉनचा प्रसार आपल्या प्रतिकाराच्या गतीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून पुढे जायचा प्रयत्न सध्या चिनी प्रशासन करतेय.

दुसरी बाब म्हणजे भारतात विरोधी पक्षांनी लसविरोधी प्रचार करूनही लसीकरणाचे जागतिक उच्चांक आणि मानांकन प्रस्थापित केल गेले. एकेकाळी इथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण होत होते की केवळ सात दिवसांच्या कालावधीत आपण संपूूर्ण इंग्लंडचे लसीकरण केले असते. पण आज चीनमध्ये काय अवस्था आहे? चीनमध्ये बहुतांश वयस्कांनी लस घेतलेली नाही. भारताला या चिनी धोक्यापासून शिकण्यासारखे खूप आहे. आतादेखील लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हाच संदेश आपल्याला मिळतोय. हाँगकाँगसारख्या एका छोट्या बेटावर आज जवळपास दहा लाख रुग्ण आहेत आणि मागच्या काही महिन्यांमध्ये आठ हजार जण करोनामुळे मृत्युमुखी पडले.

चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे वर्चस्व आहे. त्याची पोलादी पकड त्यांच्या संपूर्ण जीवन व्यवहारावर आहे. त्याच्या माध्यमातून ते काहीही करू शकतात अथवा दाबू शकतात. आतापर्यंत ज्या झिरो कोविड पॉलिसीबद्दल त्यांनी प्रचंड कौतुक करवून घेतले होते, त्याचा बुरखा मात्र आता टराटरा फाटला आहे. आजपर्यंत इतर देशांना अक्कल शिकवणारा चीन स्वतः मात्र कोविड पसरत असताना चाचपडताना दिसतोय. अर्थात, बाधितांच्या नेमक्या आकड्यांची ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फिगर कधीच समोर येणार नाही.

भारतामध्येदेखील त्यावर संशय घेतला होता. परंतु चीनमध्ये मात्र ते आकडे कव्हरअप करायचे प्रयत्न आता समोर दिसू लागले आहेत. वुहानमध्ये पहिल्यांदा हा रोग पसरला तेव्हा टेस्टिंग लॅबच नव्हत्या. त्यामुळे कित्येक मृत्यू कोविड मृत्यू म्हणून दाखवताच आले नाहीत. सध्या मात्र चिंता आहे ती चीनमधून होणार्‍या निर्यातीची. चीनकडे संपूर्ण जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून बघितले जाते. त्यामुळे तिथे मॅन्युफॅक्चरिंग बंद पडले तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणार यात शंकाच नाही. आपला जीडीपी साडेपाच टक्क्यांनी वाढेल, असा चीनचा आशावाद होता. तो आता 4.8 टक्के इतका खाली आला आहे. हे आकडेदेखील चॅलेंज केले गेले आहेत. 2022 च्या पहिल्या तिमाहीतले मॅन्युफॅक्चरिंगचे आकडे आणि विकासाचे दर, निर्यात हे सगळेच खाली कोसळलेय. दुसर्‍या तिमाहीत ते आणखी कोसळेल, असा अंदाज आहे.

शांघायची स्वतःची अशी एक अर्थसंस्कृती आहे, तिथे एक लॉजिस्टिक कल्चर आहे. स्वतःची अशी एक वृत्ती आहे. शांघाय हे एक संस्कृती जन्माला घेऊन आलेले शहर आहे. त्यामुळे तिथे हा रोग पसरल्यानंतर आता काय हाहाकार झाला असेल याचा अंदाज घेऊ शकतो. त्यात पुन्हा लोकल गव्हर्नमेंटवर वर्चस्व केंद्र सरकारचे. म्हणूनच चीनसाठी कोविड ही फक्त आरोग्यविषयक आपत्ती नाही. त्यांच्यासाठी ही राजकीय असंतोषाची पार्श्वभूमी बनली आहे. अर्थात, तिथे कम्युनिस्ट पार्टीची पकड आहे. तिथे कोणत्याही विद्रोहाचा स्वर चालू दिला जाणार नाही. विद्रोहाचा स्वर पसरला नाही पण कोविड इतर शहरांमध्ये पसरला तर… आताच बीजिंगमध्ये काही रुग्ण सापडलेत. त्यामुळे तिकडेदेखील खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जातेय. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था डामाडौल झाली आहे. पगारात कपात झाली आहे. अनागोंदी वाढली आहे.

या सगळ्याचा विचार करता चीनमधून स्थलांतर करणे शक्य असलेले आता चीनमधून स्थलांतर करून इतर कुठल्या देशात राहता येते का, याचा विचार करत आहेत. आज चीनच्या बंदरावर, विशेषतः शांघायच्या बंदरावर अनेक बोटी आपला माल उतरवण्यासाठी समुद्रात रांगा करून उभ्या आहेत. संपूर्ण जगातल्या महत्त्वाच्या बंदरांवर ही परिस्थिती आहे. युरोपमध्ये- देखील अनेक ठिकाणी हेच सुरू आहे. त्यामुळे चीनच्या निमित्ताने एकूणच लॉजिस्टिक मॅनेजमेंट क्षेत्रात हाहाकार माजला आहे.

आज चीनमध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनियस् आहेत. तिथून तयार प्रॉडक्टसचा पुरवठा न झाल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियाच्या मार्केटमध्ये आज चीनचा थंडावलेला परफॉर्मन्स दिसतोय. त्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग हे 2022 च्या अखेरीला आपल्या तिसर्‍या निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत. पुन्हा आपणच राष्ट्राध्यक्ष व्हावे असे तर त्यांना निश्चितच वाटत असणार. पण त्यासाठीची पार्श्वभूमी फारशी योग्य नाही. झिरो कोविड ही पॉलिसी योग्य होती का, याचा फैसला आज जगासमोर झालाय आणि ‘दो गज की दुरी है जरुरी’ असे म्हणणारा भारत या प्रक्रियेत यशस्वी झालाय हाच या सगळ्याचा मतितार्थ.

- Advertisment -

ताज्या बातम्या