शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी परिसरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गूढ खुनाचा तपास अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. सावळीविहीर येथील के.के. मिल्कजवळील दगडाच्या खाणीत १८ महिन्यांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य आता समोर आले आहे.
३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह मार्च २०२३ मध्ये खाणीत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (भादंवि कलम ३०२, २०१) दाखल करण्यात आला होता. मात्र, या खुनामागील आरोपी कोण याचा माग दोन वर्षांपासून लागत नव्हता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अशा न उघड खुनाच्या प्रकरणांची माहिती संकलित करून तपास गतीमान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकात उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्यासह विजय पवार, ह्रदय घोडके, लक्ष्मण खोकले, दीपक घाटकर, रमीझराजा आतार, सुनिल मालणकर आणि भगवान धुळे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिर्डीतील आकाश मोहन कपिले (वय २८, रा. विठ्ठलवाडी) याच्यावर संशय घेतला गेला. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा करत कबुली दिली. आपल्या मानलेल्या मामासोबत तो शिर्डी बसस्थानकावर बस बुकिंगचे काम करत होता. त्या वेळी भिक्षा मागणारी एक अनोळखी महिला त्याला वारंवार “तु माझा नवरा आहेस” असे म्हणायची. त्यामुळे बसस्थानकावरील इतर लोकांकडून त्याची चेष्टा होत असे. या अपमानाचा राग मनात धरून आकाशने १७ मार्च २०२३ रोजी, आपल्या वाढदिवशीच, त्या महिलेचा खून करण्याचे ठरवले. त्याने आपल्या दोनचाकीवरून महिलेला सावळीविहीर येथील दगडाच्या खाणीजवळ नेले व गळा आवळून ठार मारले. त्यानंतर मृतदेह खाणीमध्ये टाकून दिला.
दोन वर्षांपासून कोणताही ठोस धागा न सापडलेल्या या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पूर्ण केला. आरोपी आकाश कपिलेला ताब्यात घेऊन शिर्डी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलिस करत आहेत. या तपासामुळे जिल्ह्यातील न सुटलेल्या गुन्ह्यांपैकी एक गुन्हा उघड झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





