Thursday, May 14, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : "हा तर कंत्राटदारांचा अर्थसंकल्प आणि सर्वसामान्यांसाठी…"; उद्धव ठाकरेंचे टिकास्त्र

Uddhav Thackeray : “हा तर कंत्राटदारांचा अर्थसंकल्प आणि सर्वसामान्यांसाठी…”; उद्धव ठाकरेंचे टिकास्त्र

मुंबई । Mumbai

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचा कडक शब्दांत निषेध केला असून, “हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचे मृगजळ आणि केवळ कंत्राटदारांचे भले करणारा दस्तावेज आहे,” अशी टीका त्यांनी केली. सत्तेत बसलेल्यांनी सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीऐवजी केवळ शब्दांचे खेळ मांडल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे आमंत्रण’ असल्याची टीका त्यांनी केली. “मुख्यमंत्री सांगत आहेत की त्यांनी सातबारा कोरा केला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. आम्ही सत्तेत असताना अटी-शर्तींचा जंजाळ न ठेवता कालबद्ध पद्धतीने दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. मात्र, सध्याचे सरकार केवळ ‘पात्र-अपात्र’ आणि ‘शब्दांच्या खेळा’त शेतकऱ्यांना गुंतवून ठेवत आहे,” असे ठाकरे म्हणाले.

अर्थसंकल्पात वारंवार करण्यात आलेल्या २०४७ च्या उल्लेखावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकार आजच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी २०४७ ची स्वप्ने दाखवत आहे. मग आजची कर्जमाफी सरकार २०४७ ला करणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. अर्थसंकल्पातून ‘थापांचा उन्नत महामार्ग’ तयार केला असून, प्रत्यक्षात निधी कुठून आणणार याचे कोणतेही ठोस नियोजन सरकारकडे नसल्याचा दावा त्यांनी केला. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना केवळ कर्ज काढून फटाके वाजवण्याचा हा प्रकार असून, यामुळे राज्याचे कोणतेही हित साध्य होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

लाडक्या बहिणींना प्रति महिना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनाचा अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दांचा सरकारला विसर पडला आहे. लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली असून, केवळ कंत्राटदारांसाठी ठोस योजना आणि तरतुदी करण्यात आल्या आहेत. रस्ते आणि महामार्गांच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांची चंगळ सुरू असून, त्याचा सामान्य जनतेला काय फायदा होणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीचा उल्लेख करत, ३०० कोटी वृक्ष लागवडीची घोषणा ही देखील केवळ ‘थापेबाजी’ असल्याचे त्यांनी म्हटले.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वृक्ष लागवडीसाठी सरकारने आधी जमीन दाखवावी. केवळ आश्वासने देऊन पर्यावरणाचे रक्षण होत नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि महिला अशा सर्वच घटकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प निव्वळ फसवा असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात यामुळे कोणताही सकारात्मक बदल होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एकंदरीतच, महायुतीच्या या अर्थसंकल्पाने जनतेला केवळ स्वप्नांच्या दुनियेत नेले असून, वास्तव मात्र विदारक असल्याची टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...