शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Pik Bima Yojana) लाभार्थी शेतकर्यांना वेळेत विम्याचे पैसे न देणार्या कंपन्यांकडून बारा टक्के व्याज आकारले जाईल. त्याचबरोबर सोयाबीनला (Soybeans) किमान आधारभूत किंमत दिली जाईल. कांद्याचे (Onion) निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्क्यावर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून कांद्याचे दर घसरल्यास शेतकर्यांना योग्य भाव देण्याकरिता किमान आधारभूत किमतीने नाफेड व इतर संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार कांदा खरेदी करेल, असे आश्वासन देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) यांनी केले.
ना. शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सपत्नीक शिर्डीत (Shirdi) साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन (Sai Samadhi Darshan) घेतले. याप्रसंगी त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. दर्शनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan) म्हणाले, यापूर्वी विरोधकांचे सरकार संपूर्ण तालुक्यात पिकांचे नुकसान झाल्यानंतरच नुकसानाची भरपाई द्यायचे. त्यामध्ये शेतकर्यांना मोठा फटका बसायचा. तो दूर करण्याकरता आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्तीत बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देणार आहोत. त्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानीसाठी निधीची तरतूद सुद्धा वाढवली आहे. पूर्वी शेतकर्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Pik Bima Yojana) आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचा मोबदला देण्याकरिता बजेटमधील 66 हजार कोटींची तरतूद वाढवून ती 79 हजार कोटी रुपयांवर नेली आहे.
त्याचप्रमाणे शेतकर्यांना विम्याचा लाभ देण्यात उशीर करणार्या विमा कंपन्यांकडून 12 टक्क्याने व्याज आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतीत उत्पादन वाढावे याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या दृष्टीने सोयाबीनला (Soybeans) किमान आधारभूत किमती प्रमाणे भाव देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच कांद्यावरील निर्यात शुल्क यापूर्वी 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यावर आणले आहे.जर कांद्याचे भाव घसरले तर शेतकर्यांचे नुकसान टाळण्याकरिता व शेतकर्यांना (Farmer) योग्य भाव मिळावा या हेतूने केंद्र सरकार नाफेड तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करून शेतकर्यांना दिलासा देणार आहे. मी परिवारासह दरवर्षी 31 डिसेंबरला शिर्डीत येतो. 1 जानेवारीला दर्शन घेतो. मात्र यावेळी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मला येणे शक्य झाले नाही म्हणून मी आज आलो. साईबाबांचे दर्शन घेऊन समाधानी व आनंदी झालो. सर्वांवर आशीर्वाद असू दे, सर्वांचं कल्याण होवो अशी साई चरणी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितले.