मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून, त्यात शिंदेसेनेला वाढीव प्रतिनिधित्व दिले जाईल. शिवसेना शिंदे गटातर्फे खा. डॉ. श्रीकांत शिंदे, परभणीचे खासदार संजय जाधव किंवा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पैकी एकाला किंवा दोघांना ही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजले जात आहे. तर शिंदेसेनेला एकूण तीन मंत्रिपदे मिळाली तर प्रतापराव जाधव यांना कायम ठेवूनही आणखी दोन मंत्रिपदे मिळतील. अशावेळी श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एकास संधी मिळू शकेल.
संपादकीय : २७ जून २०२६ – कळ्या खुडणारा ‘शहरी शहाणपणा’
प्रतापराव जाधव यांचं मंत्रिपद जाणार की राहणार?
सध्याचे आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांच्याऐवजी खासदार संजय जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष खात्याच्या स्वतंत्र प्रभाराबरोबरच आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रतापराव जाधव यांचे मंत्रीपद जाणार की राहणार? याबद्दल प्रचंड चर्चा सुरु आहे.
डॉ. श्रीकांत शिंदेंनी घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन
पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. दोघांनीही चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतलंय. त्यामुळे या दोघांची नावे चर्चेत आहेत. ठाकरेंचे 6 बंडखोर शिवसेनेत सामील झाल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर गेलीय. यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार?
महायुतीतील तिसरा महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील हे राज्यसभा सदस्य आहेत. या पक्षाला केंद्रात एकच आणि तेही राज्यमंत्रिपद मिळाले तर पार्थ पवार यांचे नाव नक्की होऊ शकते. सुनील तटकरे यांच्या नावावरही विचार होऊ शकतो. मात्र, कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तर प्रफुल्ल पटेलांस हे तिघेही दावेदार असतील. सध्या अजित पवार गटाकडे एकही केंद्रीय मंत्रिपद नाही.




