Tuesday, May 5, 2026
HomeनगरAhilyanagar : मृत गायीप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Ahilyanagar : मृत गायीप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

शूसंवर्धन आयुक्तांकडून अभ्यास गट नेमण्याच्या सुचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर आणि पारनेर तालुक्यात अज्ञात रोगाने बळी गेलेल्या गायींच्या मृत्यूचे निदान अद्याप झालेले नाही. पुण्याच्या प्रयोग शाळेत मृत गायींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून त्याच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणी पद्मश्री पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत. तर पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त प्रवीण देवरे यांनी संबंधीत गायींचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्याच्या सुचना दिल्या आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे रविवारी दुपारपर्यंत नगर आणि पारनेर तालुक्यात मृत झालेल्या 32 गायी व उपचार सुरू असणार्‍या 9 गायींना नेमके काय झाले. त्या कशामुळे आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला याचे निदान झालेले नव्हते. मात्र, रविवारी क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय पशूवैद्यकीय (शिरवळ) सातारा येथील चार पशूवैदक यांचे पथक नगर तालुक्यात आले होते. पथकातील डॉक्टर हे पशूऔषध शास्त्र, सुक्षमजीव शास्त्र, जनवरांचे सामुहिक सार्वजनिक आरोग्य याचे अभ्यासक असून त्यांनी उपचार सुरू असणार्‍या गायींची पाहणी केली असून नव्याने दोन गायीचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. तसेच या जनावरांच्या चार्‍यात बदल करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती पशूसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी दिली.

दरम्यान, मृत गायी नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवेरबाजार आणि परिसारातील आहेत. गेल्या 14 फेबु्रवारीपासून नगर आणि पारनेर तालुक्यातील गायीबाबत हा प्रकार सुरू असतांना पशूसंवर्धन विभाग आतापर्यंत काहीच करू शकलेला नाही. यामुळे आतापर्यंत शेतकर्‍यांच्या 32 गायी मृत पावलेल्या आहेत. या प्रकरणी पहिल्या दिवसांपासून पद्श्रमी पोपटराव पवार पाठपुरवा करत असतांना पशूसंवर्धन विभागाने आवश्यक तेवढे लक्ष दिले नसल्याची चर्चा आहे. यामुळे अखेर पवार यांना याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीण्याची वेळ आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेतली असून पशूसंवर्धन विभागाचे सचिव व आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त देवरे यांनी तातडीने या प्रकरणी मृत जनावरांसह त्यांचा चारा, पाणी यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात येणार असल्याचे पद्श्रमी पवार यांना कळवले आहे.

गायींचे रक्त, शेण आणि खाद्याचे नमुने घेतले
शासकीय महाविद्यालयाच्या पथकाकडून उपचार सुरू असणार्‍या नगर तालुक्यातील दोन गायींचे रक्त, शेण आणि खाद्याचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सातारा येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालयातील पथकात डॉ. आंभोरे, डॉ. म्हसे, डॉ. माने आणि अन्य एका व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

पशूसंवर्धन विभागात विस्कळीतपणा
राज्य सरकारचा पशूसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाचे गेल्या वर्षभरापासून एकत्रिकरणाचे वारे वाहत आहे. मात्र, अद्याप हे एकत्रिकरण झालेले नाही. यामुळे या विभागाच्या कामात विस्कळीतपणा आल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पशूधन असून उत्तर नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक असल्याने भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

30 लाखांहून अधिकचा फटका
ज्या शेतकर्‍यांच्या गायी मृत झालेल्या आहेत. त्यांचे 30 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. साधारणपणे एका दुभत्या गायीची किंमत 1 लाख ते सव्वा लाख रुपये आहे. आतापर्यंत 32 गायी मृत पावलेल्या असून यामुळे शेतकर्‍याचे 30 लाखांहून अधिकचे नुकसान झालेले आहे. मृत गायीच्या किंमतीच्या सुमारे 70 ते 80 टक्के रक्कमेची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी पद्मश्री पवार यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे.

ताज्या बातम्या