Friday, May 3, 2024
Homeनगर‘अवकाळी’मुळे एकाच रात्रीतून 6 हजार 685 हेक्टरवरील शेतीला फटका

‘अवकाळी’मुळे एकाच रात्रीतून 6 हजार 685 हेक्टरवरील शेतीला फटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवारी सायंकाळी आणि रात्री झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिठीचा सर्वाधिक फटका हा नेवासा आणि शेवगाव तालुक्यातील गावातील शेतकर्‍यांना आणि शेती पिकांना बसला आहे. यासह अन्य तिन तालुक्यात अवकाळीचा तडाखा बसला असून जिल्ह्यात शुक्रवारच्या रात्रीतून पाच तालुक्यातील 12 हजार 483 शेतकर्‍यांच्या 6 हजार 685 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. मागील अवकाळीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पदरी अद्याप शासनाची मदत मिळालेली नसतांना अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात पाच तालुक्यातील 50 गावांना अवकाळी आणि गारपिठीचा दणका बसला. यात सर्वाधिक नुकसान हे नेवासा तालुक्यातील 29 गावातील 8 हजार 400 शेतकर्‍यांचे 4 हजार 300 हेक्टरवरील शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे.

या खालोखाल शेवगाव तालुक्यातील 14 गावात 3 हजार 673 शेतकर्‍यांच्या 2 हजार 197 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. यासह पारनेर तालुक्यातील पाच गावात 397 शेतकर्‍यांचे 180 हेक्टरवरील पिकांचे, कोपरगाव तालुक्यातील एका गावात 1 शेतकर्‍याचे 0.83 हेक्टरवरील आणि नगर तालुक्यातील एका गावात 12 शेतकर्‍यांचे 7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने शनिवारी केलेल्या प्राथमिक पंचानाम्यानूसार ही आकडेवारी समोर आली आहे.

या पिकांचे झाले नुकसान

मका, कांदा, वाटाणा, कलींगड, टोमॅटो, आंबा, झेंडू, उन्हाळी बाजारी, उन्हाळी सोयाबी, कांदा, गहू, केळी, डाळींब या पिकाचे नुकसान झाले असून यातील अनेक पिके ही शेतकर्‍यासाठी नगदी पिके आहेत. विशेष करून कांदा, डाळींब, केळी या पिकांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. नेमकी याच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

राहुरीचा अहवाल निरंक

जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा वांबोरी, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंभे, जेऊर यासह परिसारातील गावात जोरदार पाऊस झाला. महसूल आणि स्थानिक ग्रामपंचायातीकडील पर्जन्यमापक यंत्रात या पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, राहुरी आणि नगर तालुका कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार या ठिकाणी शेतकर्‍यांचे नुकसान झालेले नाही. वास्तवात या गावातील अनेक ठिकाणी उघड्यावर काढून पडलेल्या कांदा पिक पावसात भिजले असून यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झालेले असतांना केवळ कृषी विभागाच्या आळशीपणामुळे, चुकीच्या माहितीमुळे या गावातील पंचनामे करणे टाळण्यात आले असून या भागातील नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या