आश्वी |वार्ताहर| Ashwi
महायुती सरकारने 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणार्या तालुक्यांना अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा संकल्प केला आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 व उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक विभागीय कार्यालयामध्ये 14 असे एकंदरित रचना असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीसाठी अध्यादेश केला असून तालुक्यातील महसूल विभागावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शासनाने एकूण 62 गावे याअंतर्गत टाकली आहेत. प्रशासनाने घाईगडबडीत हा प्रस्ताव पाठवला असून हा प्रस्ताव केवळ विचारधीन आहे. कुठलेही अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती ही लोकांच्या सोईसाठी केली जाते. यामध्ये जर संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनात काही संदिग्धता असेल तर लोकांची मागणी असेल की आमची गावे ही प्रस्तावित अप्पर तहसील कार्यक्षेत्रात जोडू नये तर अशा गावांना वगळण्यात येईल. जनतेच्या मनाविरुद्ध जाऊन कुठलीही प्रक्रिया केली जाऊ शकत नाही.
माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळामध्ये अहिल्यानगर तसेच सिन्नर येथेही अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाली आहे ही शासकीय प्रक्रिया आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. पण दुर्दैवामुळे मुद्दे संपल्यामुळे तसेच लोकांची खोटी सहानूभुती मिळवण्यासाठी संगमनरचे माजी आमदार जनतेला विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने दिलेला कौल हा सर्वप्रिय असतो. जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही केली जाणार नसल्याचेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.