हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgaon
सोनगाव, सात्रळ, धानोरे, हनुमंतगाव, पाथरे व परिसरातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची अत्यंत गरज असताना मोठ्या अडचणीत सापडले आहेत. संबंधित विभागाच्या गोदामांमध्ये 90 ते 100 टन युरिया खताचा बफर स्टॉक उपलब्ध असल्याची माहिती समोर येत असतानाही अधिकारी वर्गाकडून विक्रीसाठी परवानगी न मिळाल्याने शेतकर्यांना खतापासून वंचित राहावे लागत आहे.
सध्या मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी पिकांना वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर नत्रयुक्त खताची आवश्यकता आहे. मात्र बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी खताच्या शोधात कृषी सेवा केंद्र, सोसायटीच्या फेर्या मारत आहेत. अनेक ठिकाणी खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे शासकीय पातळीवर बफर स्टॉक उपलब्ध असल्याची चर्चा सुरू आहे.
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, गोदामात साठा असूनही प्रशासकीय परवानगी मिळत नसल्यामुळे वितरण प्रक्रिया रखडली आहे. परिणामी पिकांना वेळेत खत न मिळाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अनियमित पाऊस, वाढलेले उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. परिसरातील अनेक शेतकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. खताचा साठा उपलब्ध असताना केवळ कागदी प्रक्रियेमुळे शेतकर्यांना अडवणे अन्यायकारक आहे. पिकांची वाढ कोणाची परवानगी पाहून थांबत नाही. वेळेत युरिया मिळाली नाही तर उत्पादन घटण्याचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया काही शेतकर्यांनी व्यक्त केली.
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, युरियाचा वापर योग्य कालावधीत झाला नाही तर पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे बफर स्टॉक तातडीने खुला करून शेतकर्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन उपलब्ध बफर स्टॉकच्या वितरणास तातडीने मंजुरी द्यावी, अन्यथा शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.




