Friday, May 3, 2024
Homeराजकीयठरलं ! उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

ठरलं ! उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई | Mumbai

काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या मंगळवारी म्हणजेच उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब केलं आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी सांगितलं की, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या बहुतेक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले की त्या शिवसैनिकच आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळं आमची महिला आघाडी मजबूत होईल, असंही संजय राऊत म्हणाले. उर्मिला मातोंडकर उद्या दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. या तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी चार-चार नेत्यांची नावे राज्यपाल यांना पाठवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचे नाव दिले आहे. तर शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, चंद्रकात रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटिल यांचे नाव दिले आहे. अद्याप या यादीला राज्यपालांची स्वीकृती मिळालेली नाही.

दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणुकींच्या पाच महिने आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात अंतर्गत राजकारणाचे कारण देत काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी म्हटले होते की त्यांची राजकीय आणि सामाजिक संवेदना मुंबई काँग्रेसमध्ये एका मोठ्या लक्ष्यासाठी काम करण्याऐवजी उथळ राजकारणात भाग घेण्याची त्यांना परवानगी देत नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या कामकाजामुळे पक्ष सोडला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या