नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. मंगळवारी (9 जून) इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर संतापलेल्या अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ले सुरू केले आहे. बुधवारपासून (१० जून) सुरू झालेले हल्ले आज गुरुवारी (११ जून) सुद्धा सुरू आहेत. अशातच ओमानच्या समुद्रात अमेरिकन नौदलाने केलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि थेट हल्ल्यात दोन भारतीय नाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक वरिष्ठ भारतीय मुख्य अभियंता बेपत्ता आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मालवाहू जहाजात २४ भारतीय खलाशी असून त्यातील तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. २४ भारतीयांपैकी आतापर्यंत २१ जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले असून २ भारतीयांचा मृत्यू झाला असून १ जण बेपत्ता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या भीषण लष्करी कारवाईमुळे भारत आणि अमेरिका या दोन मित्रदेशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत नवी दिल्लीतील अमेरिकेच्या सर्वात वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला तात्काळ समन्स बजावून आपला कडक निषेध नोंदवला आहे.
सेटेबेलो जहाजावर हल्ला
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सेटेबेलो’ हे व्यावसायिक जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून जात होते. त्यावेळी त्याला अडवण्यात आले. पलाऊ देशाचा झेंडा असलेले हे जहाज इराणी बंदरावरील अमेरिकेच्या नाकेबंदीतून वाचण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन लष्कराच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे अमेरिकन विमानाने जहाजाच्या इंजिन रूमवर अचूक निशाणा साधला. यामुळे टँकरच्या इंजिन रूमला आग लागली होती. ज्यानंतर २४ भारतीयांपैकी २१ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. तर, २ भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर १ जण बेपत्ता आहे. याबाबत अमेरिकन सेंट्रल कमांडने हल्ल्याची कबुली दिली.
भारतीयांची ओळख पटली
अमेरिकेच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीय नाविकांची नावे समोर आली आहे. आदित्य शर्मा (डेक कॅडेट), शिवानंद चौरसिया (इंजिन फिटर) यांचा मृत्यू झाला आहे. तर चीफ इंजिनिअर पटनाला सुरेश अद्याप बेपत्ता आहेत. ओमान नौदलाच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे, मात्र त्यांच्या वाचण्याची आशा आता खूपच धूसर झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा निषेध
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी उशिरा रात्री निवेदन जारी करत या हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ओमानमधील आमचा दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि ओमानी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेत सक्रियपणे सहकार्य करत आहे. या प्रदेशात जहाजांवर होत असलेले सततचे हल्ले चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत. आम्ही पुन्हा एकदा तणाव तात्काळ कमी करण्याचे आणि सुरू असलेल्या चर्चांना कूटनीतिक तोडग्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या भागात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे या प्रदेशातील समुद्री मार्गांवर निर्बंधमुक्त वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे.
या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून अधिकृत निषेध पत्र सुपूर्द केले. “भारतीय नाविकांच्या जीवाला धोक्यात आणणारी कोणतीही अमेरिकन लष्करी कारवाई खपवून घेतली जाणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा भारताने दिला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे तातडीने थांबवावे, अशी मागणी भारताने केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




