नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ बुधवारी भयंकर अपघात घडला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचे हेलिकॉप्टर धडकले आहे.या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीही पोटोमॅक नदीत कोसळले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. यामुळे रेगन विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या हेलिकॉप्टरशी विमानाची धडक झाली ते सिरोस्की एच-६० प्रकारचे हेलिकॉप्टर होते. तर मीडिया रिपोर्टनुसार, ज्या विमानाला अपघात झाला, ते एक लहान आकाराचे प्रवासी विमान होते. यात ६५ लोक बसू शकत होते. अपघातावेळी विमानात ६० प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हे विमान कॅन्ससहून वॉशिंग्टनला येत होते.
एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ५३४२ हे विमान ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्ससह विचिटा, कॅन्सस येथून निघाले होते. याचवेळी समोरून अमेरिकन सैन्यांचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आले. या दोघांची हवेतच धडक झाली. हे प्रवासी विमान आणि सैन्याचे हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळले.
एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करत अपघाताची पुष्टी केली आहे. PSA द्वारे चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट ५३४२ कॅन्ससहून वॉशिंग्टनच्या रीगन विमानतळावर येत होते. ज्याचा अपघात झाला आहे.
अमेरिकेचे सिनेटर टेड क्रूज यांनी या घटनेबद्दल म्हटले आहे की, या अपघातात लोकांचा मृत्यू झाला आहे, पण अजून आम्हाला हे माहिती मिळू शकलेली नाही की, विमानातून किती लोक प्रवास करत होते. या विमान अपघातानंतर वॉशिंग्टन विमानतळ बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पोटोमॅक नदीत शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. यात यूएस पार्क पोलिस, डीसी मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आणि अमेरिकन सैन्यासह अनेक एजन्सींचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीसी फायर आणि ईएमएस विभागाने म्हटले आहे की अग्निशमन नौका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा