अल्मोडा । Almora
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस खोल दरीत कोसळल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी बस आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास द्वारहाट येथून निघाली होती. भिकियासैनमार्गे ही बस रामनगरच्या दिशेला जात असताना भिकियासैन-विनायक-जलाली रस्त्यावरील शिलापाणीजवळ ही दुर्घटना घडली. वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट खोल दरीत कोसळली. सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने बस पूर्णपणे भरलेली होती. बस दरीत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला, मात्र बसची अवस्था अत्यंत भीषण असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.
या भीषण अपघातात आतापर्यंत सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. याशिवाय, अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एसडीआरएफ (SDRF) आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. दुर्गम भाग असल्याने बचावकार्यात अडचणी येत असल्या तरी मदत कार्य वेगाने सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून भिकियासैन येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “अपघाताची माहिती मिळताच आमची पथके घटनास्थळी रवाना झाली होती. जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्राधान्य दिले जात आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत,” असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण अल्मोडा परिसरात आणि मृतांच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. उत्तराखंडमधील डोंगराळ भागात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलीस या अपघाताचे नेमके कारण काय होते, तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा तपास करत आहेत.




