बीड । Beed
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराड अखेर पोलिसांच्या शरण आला आहे. पुण्यातील सीआयडीच्या समोर वाल्मीक कराडने सरेंडर केलं.
कालपासून वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज १२ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. वाल्मीक कराड पोलिसांच्या शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आरोपी स्वत: शरण आला असेल तर यात पोलिसांनी काय कारवाई केली? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडच्याशरणागती पत्करताच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी पोलिस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. वैभवी म्हणाली, “आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच आमची आहे. पोलिस यंत्रणा काम करते आहे तर मग आरोपीला पकडायला येवढा वेळ का लागत आहे? शिवाय गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलिस यंत्रणा काय काम करतेय? आरोपींना पकडायला इतका वेळ का लागत असेल तर आम्हाला न्याय कसा मिळणार? असे प्रश्न वैभवीने उपस्थित केले. शिवाय यावेळी तिने माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली, त्यांना अटक करा आणि फरार असलेल्या आरोपींना अटक करा, असंही तिने म्हटलं आहे.
दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याविरोधात बीडमधील केज पोलीस ठाण्यात खंडणीच्या खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडीसमोर शरण जात आहे. जरी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि यात जर मी दोषी ठरतो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ते भोगण्यास मी तयार आहे. असं वाल्मिक कराडने म्हंटल आहे.