पुणे | Pune
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) (Vaishnavi Hagawane) हिने सासरच्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. वैष्णवीची मोठी जाऊ आणि हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप-हगवणे (Mayuri Hagawane) यांनी देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.तसेचकरिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला आहे.
मयुरी जगताप-हगवणे हिने माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, त्याचे आई-वडील आणि नणंद या सगळ्यांनी पती सुशील व आपल्याला मारहाण करत असायचे. सासरे राजेंद्र हगवणे यांनीही आपल्यावर हात उचलला होता. तर नणंद, दीर, सासू यांनी माझा कायम छळ केला. सासूने माझे कधी लाड केले नाहीत. जर त्यांनी लाड केले तर नणंद त्यांना त्रास देत असायची. पण पती सुशील मला साथ देत होते, ते माझ्या पाठीशी होते. ते पाहून त्यांनी माझ्या पतीला देखील मारलं. तसेच त्यांनी माझ्या मुलालाही मारले. याशिवाय नणंद आणि दीराने आपल्या चारित्र्यावर संशय घेतला होता”, असा आरोपही मयुरी यांनी केला.
तसेच “माझी ननंद करिष्मा हगवणे, सासू आणि दीर या लोकांनी मला लग्नाच्या महिनाभरातच टॉर्चर करण्यास सुरुवात केली होती. लहानसहान गोष्टीवरुन माझा छळ करायचे, साडी कशी घालते, कपडे कसे घातले, सासऱ्यांकडे बघते अशा गोष्टींवरुन ननंद त्रास द्यायची. मी घर सोडलं नाही तर, माझ्या नवऱ्याने मला आईकडे आणून सोडलं. कारण, ती लोक खूप क्रूर वृत्तीची आहे. ते मला जिवंत ठेवणार नाहीत, हे त्यांच्या मुलालाही कळालं होतं. म्हणून त्यांनी मला आईकडे आणून सोडलं, त्या घरातही आम्ही बाहेरच्या खोलीत वेगळंच राहत होतो. तिथेच मी दीड वर्ष माझा संसार केला. तिथूनही बाहेर पडणार होतो”, असेही मयुरीने सांगितले.
पुढे तिने सांगितले की, “ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. तिला जी मारहाण वगैरे होत होती, त्याबाबत बाहेर काही कळत नव्हतं. तिथे काम करणारी लोक मला सांगायचे की तिला मारहाण झाली, तिला त्रास देतात. माझी सख्खी जाऊ असून दोन वर्षात आम्ही एकमेकींशी बोललो देखील नाहीत. माझा नवरा दीराला समजवायचा की तू तिला एवढा त्रास देऊ नको, तेव्हा तो म्हणायचा की तुमचं तुम्ही बघा. आमच्यामध्ये बोलू नको. आम्हाला तिचा त्रास दिसायचा पण आम्ही बोलू शकत नव्हतो”, असेही मयुरी जगताप-हगवणे यांनी म्हटले.
मयूरीच्या भावाने दाखवले CCTV फुटेज
मयुरीचा भाऊ म्हणाला की, “वैष्णवीच्या बाबतीत अगोदर कल्पना नव्हती. पण सगळ्यात पहिले माझ्या बहिणीसोबत या गोष्टी चालू झाल्या. आम्ही प्रत्येक वेळेस मयुरीला साथ देखील दिली. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जाणे, मीटिंग बसवणे, कुठे काय कोणाचं चुकत असेल तर समजावून सांगणे. या गोष्टी वारंवार होत होत्या. दोन वेळेस आपण त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या येथील गावातील कोणीतरी ओळखीचे लोक येऊन मध्यस्थी करायचे. पण त्यांची सुधारायची मानसिकता नव्हती.त्यांनी तिसऱ्या वेळेस देखील तेच केले. रात्रीच्या दरम्यान बहिणीचा आम्हाला फोन आला की, मला मारहाण केलेली आहे. त्यावेळेस आम्ही पोलीस ठाण्यात गेलो तर आमच्यात आणि त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. आम्ही तक्रार दाखल केली. शशांक हगवणे हे मोबाईल घेऊन पळून जातानाचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या वेळेस भांडण सुरू होते ते त्यावेळेस बहिणीने लाईव्ह वगैरे केले होते, त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे”, असे म्हणत मयुरी यांच्या भावाने शशांक हगवणे याने मयुरीला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले.