Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीने गोदाकाठ दुमदुमला

Nashik News : वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीने गोदाकाठ दुमदुमला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

जुन्या नाशिकसह गोदाकाठ परिसर आज दाजीबा बाशिंग वीरांच्या पारंपरिक मिरवणुकीने दुमदुमून गेला. बुधवार पेठेतील मिरजकर गल्लीतून निघालेली ही मिरवणूक जुन्या नाशिकमार्गे थेट रामकुंड पर्यंत काढण्यात आली. चंद्रग्रहणामुळे यंदा मिरवणुका उशिरा निघाल्या, तरीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

डोक्यावर फेटा, त्यावर खंडेराव महाराजांचा मुखवटा, कपाळावर मुंडावळ्या, कानात सोन्याच्या बाळ्या, गळ्यात सरी, अंगात सदरा, कमरेला धोतर, हातात कडे आणि पारंपरिक बाशिंग परिधान केलेले दाजीबा वीर ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत मार्गक्रमण करत होते. त्यांच्या पारंपरिक वेशभूषा आणि ठसकेबाज नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही मिरवणूक सदाशिव भागवत यांच्या काळापासून सुरू असल्याचे सांगितले जाते. आज त्यांच्या चौथ्या पिढीकडून दाजीबा वीर बनून ही परंपरा जिवंत ठेवली जात आहे. “नवसाला पावणारा दाजीबा” अशी या वीरांची ओळख असून भाविक मोठ्या श्रद्धेने त्यांच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेत होते. नारळ-खणाची ओटी भरून नवस व्यक्त केला जात होता. वर्षभरात मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने ओटी भरण्यासाठी विशेष गर्दी दिसून आली.

प्रत्येक वीराने होळीभोवती प्रदक्षिणा घालत घरातील टाकाचे रामकुंड येथे पूजन करून स्नान घातले. मिरवणुकीची सांगता रामकुंडावर झाली. मार्गात अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. काही भाविक आपल्या देवघरातील टाक मिरवणुकीत नाचवत सहभागी झाले होते.

धुळवडीच्या दिवशी राज्यातील अनेक भागांत वीरांच्या मिरवणुका निघतात; मात्र बाशिंगे वीरांची ही अनोखी आणि पारंपरिक मिरवणूक केवळ नाशिक शहरातच निघते, ही तिची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. परंपरेची ही अखंड साखळी यंदाही उत्साहात कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...