Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

- Advertisement -

भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ, सुरेल आणि शास्त्रीय गायकीने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी (३१ मे) दुःखद निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, एका सुवर्णकालीन सुरेल पर्वाचा अंत झाल्याची भावना संगीतप्रेमींनी व्यक्त केली आहे.

२८ जानेवारी १९३७ रोजी ‘सुमन हेमाडी’ म्हणून जन्मलेल्या सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजात असलेली मधुरता, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे त्या रसिकांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या.

सुमन कल्याणपूर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत अनेक अजरामर गीते संगीतविश्वाला दिली. हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या गीतांबरोबरच मराठी भावगीत आणि चित्रपटगीतांनाही त्यांनी विशेष समृद्ध केले.

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला”, “निंबोणीच्या झाडामागे”, “अरे संसार संसार”, “केतकीच्या बनी तिथे नाचला मोर”, “पिवळी पिवळी हळद लागली”, “रिमझिम झरती श्रावणधारा”, “विसरशील तू सारे” आणि “नाविका रे वारा वाहे रे” यांसारखी अनेक अजरामर गीते त्यांनी गायली. त्यांच्या गीतांतील भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि सुरांची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते.

सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे भारतीय संगीतसृष्टीने एक अमूल्य स्वररत्न गमावले आहे. त्यांच्या स्वरांचा ठेवा आणि त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांमधून त्या कायम रसिकांच्या स्मरणात राहतील. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि संगीतप्रेमींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील पाण्याच्या पाटाजवळ संशयास्पदरीत्या फिरणार्‍या दोन इसमांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर आणि मोबाईल असा मुद्देमाल...