दिल्ली । Delhi
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या अचानक निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला, जो स्वीकारण्यात आला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धनखड यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.
जगदीप धनखड यांना यावर्षी मार्चमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले होते. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी उपराष्ट्रपती पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यकाळाची मुदत २०२७ पर्यंत होती, परंतु दोन वर्षे आधीच त्यांनी पदत्याग केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
धनखड यांनी २०२२ मध्ये भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. उपराष्ट्रपती पदावरील त्यांचे योगदान आणि अनुभव यामुळे त्यांच्या राजीनाम्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदपीप धनखड यांच्या राजिनाम्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “श्री जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती यासह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो” या आशयाची पोस्ट त्यांनी केली.
धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी नवीन नियुक्ती कशी होईल, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय विश्लेषक आणि पक्षांमध्ये यासंदर्भात अनेक अंदाज बांधले जात आहेत. धनखड यांच्या निर्णयामागील नेमके कारण आणि त्यांच्या पुढील योजनांबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हा राजीनामा केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही चर्चेचा विषय ठरला आहे. धनखड यांनी आपल्या कारकिर्दीत दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना यामुळे त्यांचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आगामी काळात उपराष्ट्रपती पदासाठी कोणाची निवड होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




