नवी दिल्ली | New Delhi
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी (Vice President) उद्या (मंगळवार दि.०९ सप्टेंबर) रोजी निवडणूक (Election) होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांच्या (MP) बैठकांचे सत्र सुरु आहे. दोन्ही आघाड्यांकडून आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक होत आहे.
देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची ही १७ वी निवडणूक असून, हे पद एका इलेक्टोरल कॉलेजद्वारे निवडले जाते. ज्यात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा (Loksabha and Rajyasabha Members) सहभाग असतो. उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड आहे, कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे आणि मतदानाची प्रक्रिया नेमकी कशी असते? हे जाणून घेणार आहोत.
सुदर्शन रेड्डी VS सीपी राधाकृष्णन यांच्यात लढत
भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना रिंगणात उतरवले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे भाजप संघटनेचे एक निष्ठावंत आणि विश्वासू चेहरा मानले जातात. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूत पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने व्ही.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली असून, ते न्यायव्यवस्थेत त्यांच्या प्रामाणिक आणि निष्पक्ष प्रतिमेसाठी ओळखले जातात. संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ते काम करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असल्याने ही निवडणूक रंजक होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी कोण-कोण मतदान करतं?
लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान (Voting) करतात. यावेळेस उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेचे २३३ खासदार मतदान करतील. तसेच या निवडणुकीत एकूण ७८२ खासदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य समान धरले जाते. राज्यसभेची सदस्य संख्या ही एकूण २४५ असून २३८ सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित राज्यातील आमदारांकडून निवडले जातात. तर १२ सदस्य हे नामनिर्देशित असतात.
कोणत्या पक्षाचा कुणाला पाठिंबा?
भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) लोकसभेत पूर्णपणे बहुमत असल्याने सीपी राधाकृष्णन यांचा विजय जवळपास पक्का मानला जात आहे. मात्र, विरोधी पक्षही एकजूटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार व्ही. सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष, शिवसेना (उबाठा) आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पाठिंबा आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मागितला होता, परंतु स्टॅलिन यांनी कोणतेही विधान करणे टाळले. याशिवाय, वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत चार आणि राज्यसभेत सात सदस्य असून, त्यांच्या पक्षाने एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते.
बीजेडीचे ठरेना
ओडीशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांनी अद्याप कोणत्याही उमेदवाराला (Candidate) पाठिंबा दिलेला नाही. तर बीजेडीच्या ज्येष्ठ आमदार प्रमिला मलिक यांनी “पक्षप्रमुख ओडिशाचे हित सर्वोतरी ठेवून योग्य वेळी निर्णय घेतील”, असे म्हटले आहे. सध्या पटनायक हे दिल्लीत असून, उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करण्याबाबत त्यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे अजूनही मतदानाबाबत ठरल्याचे दिसत नाही.
कुणाचे पारडे जड?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पारडे जड असल्याचे बघायला मिळत आहे. लोकसभेत एनडीएच्या खासदारांची संख्या २९३ एवढी आहे. तर राज्यसभेत १३० इतकी आहे. याशिवाय १२ नामांकित सदस्यांचे संख्याबळ देखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एनडीएकडे एकूण ४३५ खासदार असून, ७८३ खासदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर ३९२ हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे जर क्रॉस व्होटिंग झाले नाही तर एनडीएचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे उद्या देशाच्या उपराष्ट्रपतीपदी कुणाची निवड होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अशी असते मतदान प्रक्रिया
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, १९७४ च्या नियम ८ अंतर्गत संसद भवनात मतदान होते. तर उपराष्ट्रपतींची निवड ही संविधानाच्या अनुच्छेद ६६ अंतर्गत एकल हस्तांतरणीय मत (STV) वापरून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केली जाते. मतदार गुप्तपणे त्यांचे मतदान करतात. ते उमेदवारांना पसंतीच्या क्रमाने (१, २ ३ अशा पद्धतीने) क्रमवारी लावतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या निम्म्याहून अधिक मते मिळणे आवश्यक असते. जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची बहुमत मिळाली नाही, तर सर्वात कमी मते मिळवणाऱ्या उमेदवाराला बाद केले जाते आणि ती मतपत्रिका पुढील उपलब्ध पसंतींमध्ये ट्रान्सफर केले जातात. निवडणुकीतील उमेदवार बहुमत मिळवेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेतली जाते. या मतदानावर नजर ठेवण्यासाठी एक निवडणूक अधिकारी नियुक्त केला जातो.




