Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026 : भाजपने विधानपरिषदेसाठी साधलं सोशल इंजिनिअरिंग; संधी मिळालेले...

Vidhan Parishad Election 2026 : भाजपने विधानपरिषदेसाठी साधलं सोशल इंजिनिअरिंग; संधी मिळालेले उमेदवार नेमके कोण?

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस असून, भाजपकडून (BJP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीमधील शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार आज (बुधवार) सायंकाळपर्यंत निश्चित होऊ शकतो. तसेच मविआकडून ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे आज सायंकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असतील? हे समजू शकेल.

- Advertisement -

दुसरीकडे भाजपने (BJP) जातीय समतोलाचे भान ठेवत सोशल इंजिनिअरिंग साधताना पक्ष संघटनेतील निष्ठावंत आणि जुन्या नेत्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने तीन ओबीसी, एका मराठा आणि एक अनुसूचित जाती तर एका जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेसाठी भाजपने सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपने संधी दिलेले उमेदवार नेमके कोण?

१) संजय भेंडे

मुळचे नागपूरचे असलेले भेंडे हे भाजपचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून सध्या ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा स्तरापासून भाजपच्या संघटनेत अनेक पदे भूषविली आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ते नेहमीच नितीन गडकरी यांचे निवडणूक प्रमुख राहिले आहेत. तसेच सहकार चळवळीत देखील ते सक्रीय असून नागपूर नागरी सहकारी बँकेचे संचालक राहिले आहेत.

२) डॉ. माधवी नाईक

ठाण्याच्या माजी नगरसेविका नाईक अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष देखील राहिल्या आहेत. सध्या त्या प्रदेश सरचिटणीस आणि विमानतळ प्राधिकरणाच्या सदस्य आहेत. त्यांच्या रुपाने भाजपने महिला व अनुसूचित जातीला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.

३) प्रमोद जठार

कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते म्हणून जठार यांना ओळखले जाते. त्यांच्या रूपाने कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भाजपकडून भरुन काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

४) सुनील कर्जतकर

विधानपरिषदेसाठी भाजपने कर्जतकर यांना उमेदवारी देऊन एका निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. सुनील कर्जतकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाते हे भाजपने दाखवून दिले आहे.

५) विवेक कोल्हे

सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे विवेक कोल्हे हे नातू आहेत. तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन विवेक कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली होती. त्यावेळी ही जागा अजित पवारांच्या राष्ट्र्वादीच्या आशुतोष काळे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. तेव्हा फडणवीस यांनी कोल्हे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा शब्द दिला होता. तो शब्द भाजपने पाळल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori जनगणनेचे प्रात्यक्षिक (Census Demonstration) करण्यासाठी कर्मचारी दिंडोरी शहरातील घरोघरी जात असून प्रात्यक्षिकांमुळे दिंडोरी शहरात (Didnori City) सुध्दा जनगणनेविषयी औत्सुक्य...