नाशिक | विजय गिते | Nashik
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक (Nashik Vidhan Parishad Election) जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) (BJP and Shinde Shivsena) या दोन्ही पक्षांनी ही जागा लढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विरोधी महाविकास आघाडीच्या गोटात मात्र सध्या ’सब शांती शांती’ असल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण पक्षीय बलाबल पाहता महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांकडे जवळपास सारखेच संख्याबळ असल्याने, ही निवडणूक महायुतीअंतर्गत ’भाजप विरुद्ध शिंदे सेना’ अशीच रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मुंबई वारी करत उमेदवारीसाठी पक्षातील नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election 2026 : भाजप-शिंदेसेनेतच होणार लढत; भाजपचे १६४ तर शिंदेकडे १५९ संख्याबळ, सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची
दराडे विरुद्ध गिते थेट लढतीची चर्चा
महायुतीमधून (Mahayuti) दोन्ही बाजूला इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजपकडून गणेश गिते तर शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी आमदार नरेंद्र दराडे यांची नावे आघाडीवर आहेत. गणेश गीते हे कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या सोबतीने बापू पिंगळे आणि सुरेशअण्णा पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे. २०१८ च्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा पराभव केला होता. दराडे आता शिंदे सेनेत असल्याने ते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्याशिवाय भाऊसाहेब चौधरी, अंजुम सुहास कांदे, अजय बोरस्ते आणि विजय करंजकर हे देखील इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नावाची चर्चा असून, अजित पवार गट या निवडणुकीत काय भूमिका घेतो, यावर बरेच समीकरण अवलंबून असेल.
महाविकास आघाडी बॅकफूटवर
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे संख्याबळाची मोठी कमतरता असल्याने ते उमेदवार देणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी स्पष्ट केले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील संख्याबळ आणि परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. २०१८ च्या तुलनेत यंदा नाशिकचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे. दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यामुळे सत्ता कारणाचे केंद्र बदलले असून महायुती कागदावर अत्यंत प्रबळ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ’आर्थिक सक्षमता’ हा अत्यंत महत्त्वाचा निकष मानला जात असल्याने, शेवटी पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे पारडे जड; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या?
मतदारसंख्या, पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने यंदा केवळ मनपा, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्यच मतदानाचा हक्क बजावतील. मनमाड नगरपालिकेच्या दोन जागा रिक्त असल्याने एकूण ५८१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
संस्थानिहाय मतदार
नाशिक महापालिका १२२, मालेगाव महापालिका ८४, नगरपालिका / नगरपरिषद ३७७, एकूण मतदार – ५८३ (२ रिक्त जागा वजा करता प्रत्यक्ष मतदार – ५८१)
पक्षीय बलाबल स्थिती (एकूण ५२२ अधिकृत पक्षीय जागा)
राजकीय पक्ष मतदार संख्या (नगरसेवक) भाजप-१६४, शिवसेना (शिंदे गट)-१५९, राष्ट्रवादी (अजित पवार गट)-१५९, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ४७, इस्लाम पार्टी – ३५, राष्ट्रवादी (शरद पवार गट)-१६, इतर छोटे पक्ष व अपक्ष – ५९
एकूण संख्याबळ पाहता महायुतीकडे (भाजप + शिंदे गट + अजित पवार गट) मिळून तब्बल ४८२ मते आहेत, ज्यामुळे महायुतीचे पारडे जड असले तरी अंतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठीची चुरस मात्र शिगेला पोहोचली आहे.
हे देखील वाचा : Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; नाशिकसह ‘या’ मतदारसंघांमध्ये रणधुमाळी, १८ जूनला मतदान, मतमोजणी कधी?




