Wednesday, May 20, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Vidhan Parishad Election 2026 : भाजप-शिंदेसेनेतच होणार लढत; भाजपचे १६४ तर...

Nashik Vidhan Parishad Election 2026 : भाजप-शिंदेसेनेतच होणार लढत; भाजपचे १६४ तर शिंदेकडे १५९ संख्याबळ, सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

नाशिक | विजय गिते | Nashik

राज्य निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या (Local Body Vidhan Parishad Election) निवडणुकांचे बिगुल वाजले असून, नाशिक जिल्हा (Nashik District) राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा तापू लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक व मालेगाव महानगरपालिका आणि जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय बलाबल पूर्णपणे बदलले आहे. नवीन पक्षनिहाय आकडेवारी पाहता या निवडणुकीत सत्ताधारी महायुती’चे (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) पारडे कमालीचे जड झाले असून, ही जागा आपल्याकडेव ठेवण्यासाठी विशेषतः भाजपचा दावा अधिक मजबूत झाला आहे.

- Advertisement -

निवडणुकीसाठी (Election) एकूण ५८३ मतदार असून यापैकी दोन सदस्य मयत असल्याने ५८१ मतदार सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. यामध्ये नाशिक महानगरपालिकेत मध्ये १२२, मालेगाव महानगरपालिकेमध्ये ८४ तर नगरपरिषद व नगरपंचायतचे ३७७ असे एकूण ५८३ मतदार सदस्य आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने या सदस्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये महायुतीकडे स्पष्ट आणि एकतर्फी बहुमत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) १२२ जागांपैकी एकट्या भाजपकडे ७२ जागांचे स्पष्ट बहुमत आहे. त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) कडे २६ जागा आहेत. म्हणजेच मनपामध्येच महायुतीचे संख्याबळ ९८ वर पोहोचते, जे विजयासाठी अत्यंत निर्णायक आहे. तर विरोधी महाविकास आघाडीकडे (ठाकरे गट १५, राष्ट्रवादी शरद पवार गट ४, काँग्रेस ३) अवघ्या २२ ते २५ जागा आहेत. तर मालेगाव महानगरपालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी इस्लाम पार्टी ३५, एमआयएम २१, शिवसेना (शिंदे गट) १८, समाजवादी पार्टी ५, काँग्रेस ३, भाजप २ असे बलाबल आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नुकत्याच निवडणुका झालेल्या ११ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्येही महायुतीनेच बाजी मारली आहे. या नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर स्थानिक नेत्यांचे पूर्ण वर्चस्व आहे. या बदललेल्या संख्याबळामुळे महायुतीमध्येही जागा नेमकी कोणाकडे जाणार, यावरून खलबते सुरू झाली आहेत. नाशिक मनपा आणि नगरपरिषदांमध्ये एकट्या भाजपकडे पावणेदोनशेहून अधिक नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने, जिल्हा भाजपमधून या जागेवर पक्षाचाच उमेदवार असावा, असा आग्रही सूर लावला जात आहे.

‘महाविकास’ साठी अस्तित्वाची लढाई

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला (ठाकरे गट, शरद पवार गट व काँग्रेस) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र मतदारांनी फारशी पसंती दिलेली नाही. महाविकास आघाडीकडे जिल्ह्यात मिळून जेमतेम ५० ते ६० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार घडवायचा असल्यास महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस व्होटिंग’ किंवा अपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

एकूण ५८१ मतदार

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकूण ५८३ मतदार आहेत. त्यात मनमाड नगरपरिषदेच्या दोन नगरसेवकांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकूण ५८१ मतदार नगरसेवक मतदानाचा हक्क बजावतील. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींचा मतदार यादीत समावेश नाही.

संस्थानिहाय मतदार

नाशिक महापालिका – १२२
मालेगाव महापालिका – ८४
नगरपालिका, नगरपरिषद – ३७७
एकूण –
५८३

पक्षीय बलाबल स्थिती

भाजप -१६४
शिवसेना (शिंदे सेना) १५९
राष्ट्रवादी अजित पवार – १५९
शिवसेना (उद्धव ठाकरे) – ४७
राष्ट्रवादी (शरद पवार) – १६
इस्लाम पार्टी – ३५
एकूण –
५२२ – तर उर्वरित ५९ जागा या जिल्ह्यातील अन्य छोटे पक्ष व अपक्षांच्या आहेत.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यावर रोहित पवारांची पोस्ट...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या गुप्त भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण...