Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Narvekar: त्या दिवशी १२ शोक प्रस्ताव, फॉन्ट अत्यंत बारीक…; शोक प्रस्तावातील...

Rahul Narvekar: त्या दिवशी १२ शोक प्रस्ताव, फॉन्ट अत्यंत बारीक…; शोक प्रस्तावातील चुकांवर राहुल नार्वेकर म्हणाले…

मुंबई | Mumbai
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावादरम्यान जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मराठी शब्दांचे उच्चार करताना मोठ्या चुका झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नार्वेकरांना त्यांच्या मराठी उच्चारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगेच विधानसभा अध्यक्षांच्या वाचनाची दखल घेत त्यांच्यावर टीका केली. आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी शासकीय शोकप्रस्ताव वाचनासाठी ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अनेक मराठी शब्दांचा उच्चार करताना अडखळायला झाले, तर काही ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या. मराठी भाषेचा आणि सभागृहाच्या परंपरेचा हा अवमान असल्याची भावना व्यक्त करत नेटकऱ्यांनी आणि विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

राहुल नार्वेकर काय म्हणाले?
त्या दिवशी १२ शोक प्रस्ताव होते आणि त्याचे वाचन मी सभागृहात केले. जी प्रिंट माझ्या हातात आली ती अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसेच्या तसे ते वाचन झाले, ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडून घडली, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

आशाताई भोसलेंबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही करु शकत नाही
नार्वेकर यांनी सांगितले की, स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे, सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय, असे नार्वेकर म्हणाले.

Omraje Nimbalkar: महिनाभरापूरापासून पक्षांतराचं प्लॅनिंग सुरु; ओमराजेंविरोधात घरातच बंडाचा झेंडा, भावाचा मोठा गौप्यस्फोट

तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल
राहुल नार्वेकर म्हणाले की, गेली चार-साडेचार वर्षे मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे. ते काम करत असताना मी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, अनेक शोक प्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत. या सभागृहाचा संपूर्ण प्रोसिडिंग नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल ही संपूर्ण आपण मराठी भाषेतूनच हाताळली आहे. जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल असल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्या