Friday, May 3, 2024
Homeनगरगाव तेथे उद्योजक तयार करणार – नरेंद्र पाटील

गाव तेथे उद्योजक तयार करणार – नरेंद्र पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठा समाजातील युवकांना सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून गाव तेथे उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय घेऊन कार्याला सुरुवात केली आहे. यात येणार्‍या अडीअडचणी सोडविण्याचे आश्‍वासन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.

युवकांना उद्योगधंदे व व्यवसायासाठी बीजभांडवल उपलब्ध करुन स्वत:च्या पायावर उभे करणे या महामंडळाचे मुख्य उद्देश आहे. गाव तेथे उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय घेऊन कार्याला सुरुवात केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून तळागाळातील मराठा समाजातील युवक-युवतींना याचा लाभ मिळण्यासाठी तालुकास्तरीय मेळावे घेणार असून, मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक जिल्ह्यातील समन्वय समितीबरोबर बैठक घेऊन युवकांना कर्ज प्रकरणासाठी येणार्‍या अडीअडचणी सोडविण्याचे काम केले जाणार असल्याचे ना. नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील अनेक महामंडळ पोलीस यंत्रणेच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. मात्र हे महामंडळ सुरु करताना अत्यंत बारकाईने अभ्यास निर्माण करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. नगर सकल मराठा समाजाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माहितीच्या प्रसाराकरिता नगरमध्ये युवकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संग्राम जगताप, चंद्रकांत गाडे, माजी महापौर शिलाताई शिंदे उपस्थित होत्या.

पुढे नरेंद्र पाटील म्हणाले, 8 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या युवक-युवतीना व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. ही योजना पुर्णत: ऑनलाईन असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर बँकेकडून हे कर्ज मिळते. नवीन व्यवसाय करणार्‍या युवकांना आयटी रिटर्नची आवश्यकता नाही. मात्र, एखादा लाभार्थी व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज घेत असेल तर त्याला आयटी रिटर्नची गरज भासते. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता मुद्दलसह 12 टक्के व्याज दराने भरावा लागतो. नंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या हप्त्यात भरलेल्या व्याजाचा परतावा पुन्हा मिळतो. 1998 ते 2017 पर्यंत फक्त 1300 लाभार्थींना याचा लाभ मिळाला होता. मात्र, दोन वर्षात या महामंडळाकडून 10 हजार युवकांना कर्ज मिळाले असल्याचे सांगून, त्यांनी महामंडळाच्या मागील व सध्या चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला.

आ. जगताप म्हणाले, मराठा मोर्चाने समाजाला एक दिशा मिळाली. समाजातील एखादा व्यक्ती अडचणीत सापडल्यास समाजाने देखील त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. मात्र, समाजाच्या नावावर चुकीच्या गोष्टीकरुन समाजाला बदनाम करण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, असे आवाहन केले. या मेळाव्यात युवक-युवतींना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे दहा लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी, बिनतारण, बिगर जामिनदार कर्ज कसे मिळवता येईल? यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे, सचिन जाधव, सुरेखा सांगळे, अ‍ॅड. अनुराधा येवले, गोरख दळवी, अतुल लहारे, प्रशांत गायकवाड, संजय सपकाळ, अनिता काळे, सोमनाथ रोकडे आदींसह समाजबांधव व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या