विंचूर | वार्ताहर Vinchur
विंचूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या लगतच्या व दक्षिणेकडील बाजूकडील शाळेची जागा खाजगी व्यक्तीने खरेदी केल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार (दि.१२) सकाळी १०.३० वाजता सरपंच सचिन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त विंचूरकर ग्रामस्थांसह जि.प. शाळेच्या मुलांनी नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण करणार्या या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.
संबंधित व्यक्तीसह खरेदीखत बनविणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. निवासी नायब तहसीलदारांनी सदर सातबारा उतारा रद्द करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील तीनपाटी भागात जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत आहे. संपूर्ण क्षेत्रफळाचा (गट नंबर ६२७) खरेदीखत मधुकर रामचंद्र गायकर निमगाव यांनी खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली असता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. खरेदीखताची नोंद ७/१२ उतार्यावर होऊ नये, यासाठी आंदोलन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी संताप व्यक्त करीत लोकांना शाळेसह मंदिराच्या जागा कमी पडत असल्याची खंत व्यक्त करीत अशा लोकांना ग्रामस्थांनी धडा शिकवला पाहिजे, असे मत व्यक्त केले. माजी उपसभापती संजय शेवाळे यांनी अशा लोकांना विंचूरमध्ये पाय ठेवु देऊ नका, असे आवाहन आंदोलनस्थळी केले.
तहसीलदार आंदोलनस्थळी आल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाने संतप्त ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलनकर्ते आपल्या भूमीकेवर ठाम असल्याने आंदोलन बराच काळ चालले. अखेर निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी घटनास्थळी येवून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ही केवळ शाळेची जागा नसून, आपल्या गावातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. गावाच्या विकासाबरोबरच शिक्षणाचे पवित्र स्थान अबाधित राहणे, ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शाळेतील मुलांनी ‘शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी सरपंच सचिन दरेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सदस्य ज्ञानेश्वर पवार, निफाड पं.स. माजी सभापती कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, विलास गोरे, संजय शेवाळे, पांडुरंग राऊत, किशोर जेऊघाले, विजय दरेकर, सुनील दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, सोपान दरेकर, इस्माईल मोमीन, निलेश चव्हाण, निलेश सालकाडे, फिरोज मोमीन, प्रविण सालगुडे, किशोर जेऊघाले, दत्तात्रय व्यवहारे, राजेंद्र मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन सुमारे दोन तास चालू असल्याने यावेळी एक रुग्णवाहिका येवल्याकडे जात होती. रुग्णवाहिका गर्दीत अडकल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत येवल्याकडे मार्गस्थ केले. याबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याची दखल घेवून तत्काळ जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी शशिकांत मगरुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नोंद न करता सातबारा उतारा बंद करण्याचे आदेश ना. भुजबळांनी दिले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. दुसर्या व्यक्तीने पण या जागेतील काही भाग खरेदी केला होता, त्यांनी पण जागेवर दावा केला होता. त्याचा न्यायालयाचा निकाल शाळेकडून नुकताच लागला. आता हे दुसरे प्रकरण असून आज विद्यार्थी रस्त्यावर बसले होते.
सुनीता कदम, मुख्याध्यापिका, जि.प. शाळा, विंचूर
शाळेची जागा गावठाण भागात असून सिटीसर्व्हेला शाळेची नोंद आहे. सदर सातबारा हा त्याचवेळी रद्द झाला पाहिजे होता, परंतु तसे न झाल्याने ही बेकायदेशीररित्या खरेदी झालेली आहे. शाळा गावाची आहे, गावाच्या शाळेसाठी आम्ही आंदोलन केले.
सचिन दरेकर, सरपंच, विंचूर
सदर जागेची मी रीतसर मूळ मालकांकडून खरेदी केली आहे. माझ्यासारखीच इतरांनीही तेथे काही जागा खरेदी केली आहे. दहा गुंठे मी खरेदी केली परंतु या भागात इतरही दुकाने चालू आहेत, ती पण खाली करण्यात यावी आणि नियम सर्वांनाच लावण्यात यावा.
मधुकर गायकर, खरेदी घेणार





