मुंबई । Mumbai
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वादाने आता कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह कुटुंबातील ७ जणांविरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाला तोंड फुटल्यानंतर अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता २३ जुलै रोजी सुनावणी होणार असून, तोपर्यंत विनायक राऊत आणि गितेश राऊत यांची पोलीस चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर माजी खासदार विनायक राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आपली बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली. सुनेने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत राऊत म्हणाले, “हे सर्व आरोप म्हणजे केवळ वायफळ बडबड असून ती कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. तक्रारीत म्हटले आहे की भीती वाटत असल्याने ती आई-वडिलांना सोबत ठेवायची; मग जर इतका गैरप्रकार घडत होता, तर सुशिक्षित असलेल्या तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव का घेतली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, २९ डिसेंबर २०२३ रोजी ती स्वतःच्या मर्जीने १० ते १२ बॅगा भरून आपले सर्व स्त्रीधन घेऊन माहेरी गेल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी सुनेच्या बाजूने होणाऱ्या आर्थिक मागण्यांची मोठी यादीच वाचून दाखवली. “हे आरोप केवळ आमच्याकडून अवाजवी पैसे उकळण्यासाठी केले जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, वकिलांमार्फत सुरू असलेल्या चर्चेत मागण्या सातत्याने दुप्पट केल्या जात होत्या. सुरुवातीला २ कोटी रुपयांची मागणी थेट ५ कोटींवर गेली आणि आता ही एकूण मागणी तब्बल १२ कोटी ५० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये १० कोटी आणि २ कोटी रुपयांची एकरकमी रक्कम, ३ बीएचके (3 BHK) फ्लॅट, महागडी गाडी, दरमहा ५ लाख रुपये खर्च, ५० लाख रुपये वेगळे आणि १ लाख रुपये घरभाडे यासह फ्लॅटचा ईएमआय (EMI) आम्हीच भरावा, अशा अवास्तव मागण्या केल्या जात असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.
या प्रकरणात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी फिरोज शेख नावाच्या एका भोंदूबाबाला अटक केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही अध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक आहोत. पंढरीचा पांडुरंग आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही आमची दैवते आहेत. कोकणात जाऊन कुलदेवतेचे दर्शन घेणे हा गुन्हा नाही. या खोट्या आरोपांना आम्ही अजिबात भीक घालत नाही.” आमचे पोलीस संरक्षणही काढण्यात आले असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या चौकशीतून लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.




