कसबे सुकेणे | प्रतिनिधी
दोन-तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर बेमोसमी पावसाने मौजे सुकेणेसह तालुक्याला झोडपून काढले. या बेमोसमी पावसाने द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांचे धाबे दणाणले असून रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे टोपणातील व फुलाऱ्यातील द्राक्षबागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. भरणी जोगा पाऊस झाल्याने द्राक्ष पिकाला फवारणी करणे जिकिरीचे बनले आहे.
तालुक्यात सद्यस्थितीला द्राक्षबागा वेगवेगळ्या स्टेजमध्ये असून शेवटच्या टप्प्यातील द्राक्षबागांचे नुकतेच फेलफूट काढण्यात आले आहे. तसेच काळी जातीच्या द्राक्षबागा पाणी उतरण्याच्या स्थितीत आहे. सर्वात जास्त धोका टोपणातील व फुलाऱ्यातील द्राक्षबागांना असून जोरदार पावसामुळे द्राक्षबागांची गळ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच दोन दिवसाच्या सतत ढगाळ वातावरणामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता जोरदार पावसामुळे द्राक्षबागांची गळ होण्याची भीती असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत सुस्थितीत असलेल्या द्राक्षबागांवर अवकाळीचे संकट कोसळल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी केली असून त्यांना पाणी भरण्याचे काम सुरू होते. मात्र, जोरदार पावसामुळे गव्हाचे बीज दडपले जाण्याची शक्यता असून त्यामुळे गहू पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय कांदा बियाणे उगवत असून कवळ्या रोपाला जोरदार पावसाचा फटका बसणार आहे. बेमोसमी पाऊस रब्बी पिकासाठी पुढे पोषक असला तरी आज मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.