नाशिक | प्रतिनिधी
अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. ३०) मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष या दोन पदांसाठी निवडणूक होत असून, एकूण २,२४६ सदस्यांपैकी दुपारी १२ वाजेपर्यंत ५५२ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर आणि सहायक अधिकारी राजकुमार जॉली यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि.३१) आयमा रिक्रिएशन सेंटर येथे करण्यात येणार आहे. या निवडणुकीचा अधिकृत निकाल दि.१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष ललित बुब आणि विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्यात थेट लढत होत आहे. तर कोषाध्यक्ष पदासाठी हर्षद बेळे आणि अविनाश बोडके यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.




