Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामनपात नोकर भरतीची प्रतीक्षा

मनपात नोकर भरतीची प्रतीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचा ( Nashik City ) झपाट्याने विकास होत आहे. त्यानुसार सतत लोकसंख्या देखील वाढत आहे. नाशिकचे वातावरण इतर शहरांच्या तुलनेत चांगल्या असल्याचे बोलले जाते. यामुळे महाराष्ट्रातील इतर भागासह देशभरातील नागरिक नाशिकला पसंती देत आहे. यामुळे नवनवीन लोकवस्ती निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या लोक वस्त्यांमध्ये सुखसुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पाहिजे त्या प्रमाणात सुख सुविधा मिळत नाही, त्यामुळे नाशिक महापालिकेत ( NMC ) नोकर भरती ( Recruitment )झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या प्रमाणात सुविधा मिळतील तसेच महापालिकेच्या सेवकांवरील ताण देखील कमी होणार आहे.

नाशिक महापालिकेत मागील 24 वर्षापासून नोकर भरती प्रक्रिया झालेली नाही. दुसरीकडे महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाय म्हणून तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी महापालिकेत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता, शासनाने देखील काही पदांना मंजुरी दिली होती. या नंतर मात्र राज्यात सत्तांतर झाले तर नाशिक महापालिकेत देखील नव्याने डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे आयुक्त तथा प्रशासक म्हणून आले आहे. ते नोकर भरतीसाठी प्रयत्न करणार का अशी चर्चा असते.

नाशिक महानगरपालिकेत नोकर भरती व्हावी, यासाठी तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा घेऊन प्रस्ताव मंजुर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे. त्यात सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनी सुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी करून महापालिकेत भरती करण्याचा ठराव मंजूर केला होता. यावेळी महापालिकेचा आस्थापना खर्च हा 35 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे शासनाकडून भरती प्रक्रियेला मंजुरी मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

मार्च महिन्यापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यामुळे महापालिकेच्या सदस्यांच्या कार्यालय त्या ठिकाणचा कर्मचारी वर्ग वाहनाचा खर्च अशा अनेक खर्चांना ब्रेक लागला असल्यामुळे महापालिकेचा हा आस्थापना खर्च 35% च्या आत आला आहे. याच विषयाला अनुसरून तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता या पाठपुराव्याला यश येऊन महापालिकेच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले होते तर ही भरती प्रक्रिया नामांकित अशा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यामुळे महानगरपालिकेत भरती होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याचा दावा केला जात होता. यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे आयुक्त पवार यांची बदली झाली या बदलीबरोबरच हा विषय सुद्धा बाजूला पडला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील शिंदे फडणवीस सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावतील असा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधांचा उपयोग होणार का

नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर आयुक्त असलेले कैलास जाधव यांच्याकडे ती जबाबदारी शासनाने दिली. यानंतर त्यांची बदली करून मातोश्रीचे जवळचे असलेले रमेश पवार यांना आयुक्त तथा प्रशासक म्हणून नाशिकला पाठविण्यात आले. मात्र राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तेव्हापासून नाशिक महापालिकेत पुन्हा आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती व झालेही तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे तसेच समृद्धी महामार्गाच्या कामात मोलाची कामगिरी बजावणारे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे शिंदेंचे व त्यांचे असलेले संबंध जगजाहीर झाले. दरम्यान नाशिक महापालिकेत नोकरी भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ. पुलकुंडवार आपल्या संबंधांचा उपयोग करून घेणार का अशी देखील चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या