राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात वाकड़ीच्या खंडोबाच्या यात्रोत्सवास सुरुवात झाली. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावत खंडोबा देवाचे दर्शन घेतले.
येळकोट येळकोट जय मल्हार।
सदानंदाचा येळकोट॥
या जयघोषात वाकडीच्या खंडोबाच्या चंपाषष्ठी यात्रेनिमित्त पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी वाकड़ीच्या खंडोबा महाराजांचे दर्शन घेत कांदे-वांगे, भरित रोड़गा नैवेद्य वाहून भंडारा खोबरे उधळण केले. दोन दिवसीय यात्रेच्या अगोदर रविवार आल्याने वाकडीच्या खंडोबा मंदिरात चार दिवसांपासून दर्शनास गर्दी होती. श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टने ग्रामस्थांच्या सहकार्याने या यात्रेची चांगली तयारी केली होती. या यात्रेत हजारो भाविकांनी देवाला कांदे वांगे नैवेद्य वाहिले.
वाकड़ी व परिसरातील बहुतेक भाविक खंडोबाचे नवरात्र धरून नऊ दिवस रोजच्या आहारमध्ये कांदे वांगे न खाण्याचा उपवास धरतात व यात्रेला हा उपवास सोडतात. यावर्षी यात्रेत कांदे वांगेला दहा रुपये व खोबरे भंडारा देखील दहा रुपये दर तर नारळचा वीस रुपये दर होता. यावेळी वाकड़ी परिसरातील शेतकरी मंदिर परिसरात कांदे वांगे विक्रीसाठी दुकान मांडून होते. यात्रेच्या एक दिवस अगोदर गावातील हनुमान मंदिरासमोर भव्य छबिना कार्यक्रम झाला. या छबिना कार्यक्रम दरम्यान गोरे व पिंगळे कुटुंबांनी दरवर्षी प्रमाणे खंडोबा मंदिर ते गावातील हनुमान मंदिर येथे वाजत-गाजत सजविलेल्या काठ्यांची मिरवणूक काढली.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या छबिना कार्यक्रमास शेकडो भाविक उपस्थित होते तर काही मल्हारी भक्त हा छबिना कार्यक्रम (देवाचाजागर) होईपर्यंत दिवटी असलेल्या दिव्यास तेल वाहत होते. यात्रेच्या दिवशी पहाटे मंदिरातील खंडोबाची महाआरती व पूजा करण्यात आली. दुपारी चार वाजता खंडोबा देवाची प्रतिमा व मुखवटे पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून भंडारा उधळण करून, फटाक्यांची आतषबाजी करुन काढण्यात आली.
या मिरवणुकीत घोड्यांचा नाच दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीचे ख़ास आकर्षण ठरले. यात्रेत श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्यासह, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह खाजगी सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाकड़ी गावापासून खंडोबा मंदिराकड़े जाणार्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहीरी लगत असलेल्या मार्गावर अरुंद पुलामुळे यात्रेच्या पहिल्या दिवशी ट्राफिक जाम झाली होती. तसेच गोदावरी कालव्यावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात काटवन आणि गवत वाढले असल्याने त्यावरून जा-ये करणारांना मोठा त्रास सहन करावा लागला.





